आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा धडक मोर्चा, कुलूप ठोकण्याचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - नवीन जलवाहिनीच्या कामामुळे गावात महिनाभरापासून निर्जळी होती. जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून ग्रामपंचायतीने सक्तीने घरपट्टी व नळपट्टी वसुली सुरू केल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी धडक मोर्चा काढला होता. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक व सरपंच गैरहजर असल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर काढत निषेध नोंदवला. गुरुवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी या वेळी दिला.

अजिंठ्यात भारत िनर्माण अंतर्गत मोठ्या पाण्याच्या टाकीचे काम झाले. त्यातच नवीन जलवाहिनी टाकणे सुरू आहे. जुनी जलवाहिरी तोडल्यावर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था केली नसल्याने गावात महिनाभरापासून निर्जळी आहे. नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण झाले तरी गावात पाणीपुरवठा सुरळीत नाही. त्यात जोपर्यंत पूर्ण नळपट्टी भरणार नाही तोपर्यंत पाणीपुरवठा करणार नसल्याचा पवित्रा ग्रामपंचायतीने घेतल्याने संतप्त झालेल्या सुमारे दोनशेवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर सोमवारी सकाळी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता.या वेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरंपच नसल्याने त्यांनी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून िनषेध व्यक्त केला. दुष्काळात सक्तीची जुनी वसुली थांबवावी व नवीन कनेक्शन घेणारांना पाणी त्वरित सोडावे, अशी मागणी अब्दुल अजीज, अब्दुल्लाह मुजाहीद, खालेद बावजीर, डाॅ. असीम, आदींनी केली.

सुलतानी वसुली
एकीकडे दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गावात कामधंदा नाही तरीही ग्रामपंचायत सक्तीने जुनी घरपट्टी नळपट्टी पूर्ण बाकी वसुली करीत आहे. त्यात गावात पाणी नाही. वसुली टप्प्याटप्प्याने करावी. गावात नळाला पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

पाच लाख वसुली
नियमानुसार वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट आहे. त्यामुळे आम्ही वसुली मोहीम शंभर टक्के उद्दिष्टाने राबवत आहोत. आतापर्यंत ग्रामपंचायतीकडे चारशे जणांनी पाच लाख रुपये भरली आहे. त्यामुळे वसुलीत सूट देऊन त्यांच्यावर अन्याय होऊ िदला जाणार नाही, असे उपसरपंच दिलीप झरवाल म्हणाले.