आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवंश हत्याबंदीला विरोध : आठवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - गोहत्याबंदीचा कायदा पूर्वीही होता, पण गोवंश हत्याबंदीला आमचा विरोध आहे. या कायद्यामुळे हजारो लोकांवर बेकारीचे संकट कोसळले असल्याचे रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

गायीची कत्तल करण्यावर बंदी आणण्याला आमचा विरोध नाही, परंतु गोवंश हत्याबंदीला आमचा विरोध आहे. जे बैल भाकड झाले, शेतीसाठी काही उपयोगी नाहीत त्यांच्या कत्तलीवर बंदी आणू नये. रिपब्लिकन पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा सध्या प्रयत्न आहे. रिपाइंने यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. त्या वेळी आमच्या दलित मतांचा त्यांना फायदा झाला. तोच अनुभव आता भाजप-सेना पक्षाबरोबर युती केल्यानंतरही येत आहे. आमच्या युतीमुळे भाजप-सेनेचा निवडणुकीत फायदा झाला, परंतु भाजप-सेनेची मते मात्र आमच्याकडे परावर्तित होत नाहीत. त्यामुळे आता इतर जातींच्या रिपाइंअंतर्गत आघाड्या स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भूसंपादन कायद्यात काही सुधारणा करण्याची गरज आहे. ज्या जमिनी ओलिताखाली आहेत त्या जमिनी उद्योगासाठी घेऊ नयेत. शेतकर्‍याचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय त्याची जमीन संपादित करू नये. प्रकल्प जास्तीत जास्त तीन-चार वर्षांत पूर्ण व्हावेत. यासंबंधात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सरकार पडणार नाही :
मुंबई मनपा निवडणुकीनंतर राज्यातील सरकार कोसळेल, हे शरद पवार कशाच्या आधारावर म्हणत आहेत माहिती नाही. खुद्द उद्धव ठाकरे यांनीही माझ्याशी बोलताना अशी चर्चा आहे, परंतु तसे होणार नाही, असे सांगितले. कोणालाही पुन्हा निवडणुका नकोत. त्यामुळे राज्यातील सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असेही त्यांनी सांगितले.