हिंगोली - आठ-दहा वर्षांपूर्वीपर्यंत दसरा महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या रामलीला या नाटिकेला शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेल्याने रामलीला मैदान खचाखच भरून जात होते. परंतु गरब्याने तरुण, तरुणींसह ज्येष्ठांनाही आकर्षित केल्याने रामलीलेसमोरील मैदान ओस पडत असून गरब्याला मात्र हाऊसफूल्ल गर्दी होताना दिसत आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथील कलावंत गेल्या १०० वर्षांपासून येथील रामलीला मैदानावर रामायणावर आधारित १२ दिवस नाटिका सादर करीत आले आहेत. ज्यावेळी करमणुकीची साधने कमी होती आणि एक श्रद्धा म्हणून शहरासह ग्रामीण भागातून दसऱ्याला आलेले लोक रामलीला आवर्जून पाहत असत. गेल्या ८-१० वर्षांपासून मात्र, रामायण पाहणाऱ्यांची गर्दी कमी होताना दिसत आहे. याला कारणीभूत असलेली मुख्य बाब म्हणजे, दांडिया गरबा हे आहे. आज घडीला शहरात ६ ठिकाणी लहान-मोठे गरबा महोत्सव सुरू आहेत. या गरब्यामध्ये तरुण, तरुणी रात्री उशिरापर्यंत दांडिया खेळत आहेत. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकही पाहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावत आहेत. यामुळे गरबा हाऊसफुल्ल होत आहे. तर त्याउलट रामलीला पाहणाऱ्यांमध्ये कमालीची घट झाली असल्याने रामलीला मंचासमोरील मैदान ओस पडत आहे. बोटावर मोजता येतील एवढेच दर्शक हा कार्यक्रम पाहत आहेत. त्यामध्येही दुसरी बाब म्हणजे ज्यांना प्रदर्शनीत जाऊन जास्त पैसा खर्च करणे शक्य होत नाही असेच सामान्य लोक रामलीला पाहताना दिसत आहेत, तर गरब्यामध्ये सधन आणि उच्चभ्रू लोक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यामुळे येत्या पाच वर्षानंतर रामलीला पाहण्यासाठी लोकच मिळतात की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.