आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे प्रयत्न निष्फळ; बोर्डीकर सेनेच्या प्रचारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्याविरोधात जिंतूरचे काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सुरुवातीपासूनच विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांना नोटीस बजावली आहे, तरीही आमदार बोर्डीकरांच्या भूमिकेत फरक पडला नसून शिवसेनेचे भगवे रुमाल घातलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह ते अधिकच जोमाने प्रचारात उतरले आहेत. पक्षाला काय सांगायचे ते सांगू, परंतु भांबळेंचा प्रचार नाही, अशी भूमिका बोर्डीकरांनी घेतली आहे. त्यामुळे भांबळे होमपिच असलेल्या जिंतूर मतदारसंघातच अडचणीत आले आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा लोकसभेचे उमेदवार विजय भांबळे यांच्यातील राजकीय हाडवैर आता टोकाच्या भूमिकेला पोहोचले असून आमदार बोर्डीकरांनी आपला भांबळेविरोध या निवडणुकीत अधिकच तीव्र करीत सुरुवातीपासूनच शिवसेनेचा खुलेआम पद्धतीने प्रचार करण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अजित पवारांपासून ते काँग्रेसच्या दिग्गज नेतेमंडळींनीही त्यांच्या भूमिकेला आवर घालण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या 10 रोजी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी बोर्डीकरांना पुन्हा एकदा सल्ला देत कारवाईस सामोरे जावे लागेल, असा दमही भरला होता. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांना नोटीस देत आघाडीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला. दोन दिवसांत या नोटिसीचे उत्तर द्यावे; अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असे म्हटले होते. तरीदेखील त्यांच्या भूमिकेत फरक पडला नाही. उलट शानिवारी तर त्यांनी घनसावंगी, परतूर विधानसभा मतदारसंघातही बैठका घेऊन शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले.

जिंतूर पालिकेच्या सत्ताकारणापासून ते तालुक्यातील विकासकामांत एकमेकांचा विरोधातील हस्तक्षेप, सर्मथक कार्यकर्त्यांच्या हाणामार्‍या येथपर्यंत पोचलेले हे राजकारण या निवडणुकीत अधिकच चर्चेचा विषय ठरले आहे. 2004 मध्ये भांबळेंनी बहुजन समाज पक्षाकडून तर 2009 मध्ये बोर्डीकर हे काँग्रेसचे उमेदवार असताना त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकांत भांबळेंचा पराभव झाला.

काँग्रेसचे नगराध्यक्ष शिवसेनेच्या पदयात्रेत
जिंतूरचे काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी आघाडी धर्माला तिलांजली देत उघडपणे शिवसेनेचा प्रचार सुरू केला आहे. याची प्रचिती शनिवारी सेलूतही प्रकर्षाने दिसून आली. परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार संजय जाधव यांनी सेलूत काढलेल्या पदयात्रेत आमदार बोर्डीकर सर्मथक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. उमेदवार जाधवांसोबत भगव्या शर्टात अग्रभागी राहून काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष पवन आडळकर तर हात जोडून शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन करीत होते.

सेलू येथे शिवसेनेचे उमेदवार आमदार संजय जाधव यांच्या पदयात्रेत काँग्रेसचे नगराध्यक्ष पवन आडळकर शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन करीत होते.

विजय वरपुडकर सोबतीला
आमदार बोर्डीकरांच्या या भूमिकेला भांबळेविरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर यांनीही साथसंगत सुरू केली असून गेल्या आठवडाभरापासून वरपुडकर हेही बोर्डीकरांसोबत जिंतूर, परतूर, घनसावंगी मतदारसंघांत गावोगावी बैठका घेत आहेत.

काय उत्तर द्यायचे ते देऊ
काँग्रेसने बजावलेल्या नोटिसीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला काय उत्तर द्यायचे ते देऊ; पण भांबळेंचा प्रचार नाहीच, असे जाहीर वक्तव्य आमदार बोर्डीकरांनी शनिवारी झालेल्या बैठकांतून केले. जिल्ह्याचा विकास ठप्प करणार्‍या भांबळेंना मतदान करू नका, असे ते म्हणाले.