आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वर्गीय नर्तकाचे दर्शन; पक्षिमित्र गुट्टे यांनी टिपली छबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - अभावाने आढळणाऱ्या स्वर्गीय नर्तक पक्ष्याचे (एशियन पॅरेडाइज फ्लायकॅचर) दर्शन जिल्ह्यातील किनगाव शिवारात झाले. पक्षिमित्र धनंजय गुट्टे यांना हा पक्षी दिसला. उपजत नैसर्गिक सौंदर्याचा धनी असलेले हे पाखरू दिसल्याने पक्षिमित्रही सुखावले.

धनंजय गुट्टे पोलिस कर्मचारी असून पक्षिनिरीक्षण व पक्ष्यांची छायाचित्रे काढण्याचा छंद त्यांनी मनोमन जोपासला आहे. परिसरातील रानावनात त्यांची भटकंती सुरू असते. मंगळवारी ते व पक्षिमित्र अभिमन्यू मंुढे हे पक्षिनिरीक्षण करताना त्यांना शाही बुलबुलचे दर्शन झाले. या पक्ष्याचे देखणे रूप टिपण्यासाठी त्यांचा कॅमेरा सरसावला. तथापि, स्वर्गीय नर्तकाने भरारी मारली. त्याचे छायाचित्र घेतले तरच तो पक्षी किनगाव परिसरात असल्याचे इतरांना पुराव्यानिशी सांगता येईल, असे त्यांना वाटले. त्याला परत बोलावण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. त्यांच्याजवळ पक्ष्यांच्या आवाजाचे रेकॉर्डिंग आहेत. त्यात त्यांना या पक्ष्याचा आवाज आढळला. त्यांनी रेकाॅर्ड सुरू केले अन् स्वारी तत्काळ आली व झाडाभोवती घिरट्या घालू लागली.
अशी आहे शाही बुलबुल
स्वर्गीय नर्तक हा पश्चिम घाट व सातपुडा पर्वतरांगात विणीसाठी येतो व हिवाळ्यात इतर भागातही फिरतो. या पक्ष्याला इंग्रजीत ‘एशियन पॅरेडाइज फ्लायकॅचर’ तर मराठीत शाही बुलबुल, दूधराज, पतंग पक्षी, कोकण भागात पतंगा, बाणपाखरू, सुरंगी, नंदन अशा विविध नावांनी ओळखले जाते. या पक्ष्याला लाभलेल्या लांबलचक (२५ ते ३० सेंमी) शेपटीमुळे त्याला इंग्रजीत राॅकेट व रिबिन बर्डही म्हटले जाते. प्रौढ होण्यापूर्वी या पक्ष्याचा रंग चॉकलेटी असतो. पक्षी पूर्ण प्रौढ झाल्यानंतर अंगावरील पिसांचा रंग पांढरा शुभ्र, तर चेहऱ्यावरील पिसांचा रंग काळा चकचकीत होतो. दोन ते तीन वर्षांनंतर त्याला लांबलचक शेपटी लाभते. डोक्यावरील तुरा व डोळ्याभोवती निळसर कडा नराला शाही रुबाब बहाल करते. मादीला हे लावण्य लाभले नाही म्हणून ती बुलबुलसारखी दिसते. हे पक्षी जोडीने असतात. माशा, डास, फुलपाखरे, अन्य कीटक हे त्यांचे खाद्य आहे. ही माहिती पक्षी शास्त्रज्ञ सुजित नरवडे यांनी दिली.
असावे घरटे अापुले छान : पातळ गवताच्या पात्यांनी जमिनीपासून दोन ते पाच मीटर उंचीवरील फांद्यावर सुबक वाटीच्या आकाराचे घरटे हे पक्षी बांधतात. मादी तपकिरी रंगाची ठिपकेदार तीन ते पाच अंडी घालते.