आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rashtriya Swayamsevak Sangh Make Governement Programme Manikrao Thakre

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रमच सरकार राबवतेय, दुष्काळ परिषदेत माणिकराव ठाकरे यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - निवडणुकीच्या काळात भाजप –शिवसेनेने भूलथापा देऊन मते मिळवली. आता केंद्रात
आणि राज्यात सत्ता असताना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी सरकार केवळ राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम राबवण्याकडे लक्ष देत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
माणिकराव ठाकरे यांनी केली. ते जालना येथे आयोजित दुष्काळ परिषदेत बोलत होते.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार
असल्याचे ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितले.

येथील गुरू गणेश भवन मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलिया, विलास औताडे, शंकरराव राख, अमर राजूरकर, धोंडिराम राठोड, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, विमल आगलावे, आर. आर. खडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली. मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा प्रकार म्हणजे मुंबई महाराष्ट्रपासून तोडण्याचा डाव असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यामुळेच एकाही आमदाराचा पाठिंबा नसताना केवळ उद्योजक आणि कंत्राटदारांच्या भल्यासाठी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले. राज्यात दुष्काळ असताना सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रश्नावर २५ जानेवारीपर्यंत राज्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन आणि ७ किंवा ८ फेब्रुवारीला राज्यभर रास्ता राको आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी दिला.

धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, एलबीटी, औरंगाबाद येथील आयआयएम अशा सर्व
मुद्द्यांवर या सरकारने यूटर्न घेतल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
सरकारने मदत द्यावी
एफआरपीप्रमाणे ऊस दर देण्याची मागणी केली जात आहे. मात्र साखर उद्योग अडचणीत आहे. एफआरपीनुसार किमान २१०० रुपये दर द्यावा लागेल. बँक पोत्यामागे केवळ १४०० रुपये देत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उर्वरित रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी याप्रसंगी केली.

ब्रह्मा-विष्णू-महेश
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ब्रह्मा-विष्णू-महेश आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, असे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे म्हणाले, तेव्हा त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित नेत्यांसह कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

सिल्लोड, गंगापूरला परिषद
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथेही काँग्रेसची दुष्काळी परिषद झाली. या परिषदेस जवळपास पाच हजार शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गंगापूर येथेही दुष्काळी परिषद झाली. मात्र, ती राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. ही परिषद मंगल कार्यालयात झाली. या परिषदेत काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांनी युती शासनाच्या धोरणावर टीका केली.