आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामार्गावर ‘रास्ता रोको’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - राष्ट्रीय महामार्गापासून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी गुरुवारी (दि.26) दुपारी एक वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर नगरपालिकेसमोर सुमारे अर्धातास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या मध्यस्थीने तहसीलदारांनी रस्ता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोकोमुळे तब्बल अर्धातास रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती.
नगरपालिकेच्या बाजूने कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणार्‍या एकोंडी रस्त्याची गेल्या आठ वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. शहरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी व एकोंडी, पळसगाव, नागराळकडे जाणार्‍या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहने चालविताना नागरिकांचे हाल होत आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देऊनही रस्त्याचे काम झाले नाही. या रास्ता रोको आंदोलनात माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने, महाराष्ट्र विकास सेनेचे शाहुराज माने यांची भाषणे झाली. आंदोलन सुरू असताना खासदार प्रा. रवींद्र गायकवाड व नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे आदी सहभागी झाले होते. बळीराम सुरवसे, संदीप गिरीबा, बालाजी महावरकर, सचिन जाधव, विजय पवार, दतात्रय शिरगुरे, महेश माशाळकर, संतोष दहिटणे, रघुनंदन घाटे, संजय जाधव, सूर्यकांत चौधरी आदींसह एकोंडी गावचे नागरिक व आडत व्यापारी, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदारांच्या सूचना
खासदार प्रा. गायकवाड यांनी जिल्हाधिकार्‍यांना तत्काळ रस्ता दुरुस्तीच्या कामात लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची दूरध्वनीवरून सूचना केली. तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

16 जूनपासून आडत बंद
रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी बाजार समितीने 16 जूनपासून आडत बाजार बंद ठेवला आहे. यामध्ये समितीमधील आडत व्यापारी सहभागी झाले आहेत.