आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन दुकानदारांच्या माथी सडलेला गहू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - गरिबांना सवलतीत अन्नधान्य वाटप करण्यासाठी चक्क सडलेला गहू नूतन वसाहत येथील गोदामात आणण्यात आला. मात्र, गहू घेऊन जाण्यास दुकानदारांनी नकार दिल्यामुळे पुरवठा विभागाची त्रेधातिरपीट उडाली. शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यावर पुरवठा विभागाने कार्यवाहीचे पुढील सोपस्कार केले. दरम्यान, खराब गहू परत पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून अन्नधान्याची शासनाकडे मागणी केली जाते. यानुसार फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अन्नधान्याचा पुरवठा करते. सर्वप्रथम हे अन्नधान्य मनमाड येथील गोदामात व त्यानंतर रेल्वेमार्गे जालन्यात येते. भोकरदन नाका व जालना तालुक्यातील बोरखेडी येथे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची दोन गोदामे आहेत.

रेल्वेस्थानकावरून उतरवलेले अन्नधान्य प्रथम या गोदामात साठवले जाते. त्यानंतर संबंधित तालुक्यांच्या गोदामात व तेथून स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा होतो.

बोरखेडी येथील गोदामातून धान्य वाहनात भरताना तपासणी करूनच भरावे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले. गुरुवारी सडलेला गहू गाडीत भरून जालन्यातील गोदामात उतरवण्यात आला. मात्र, धान्य दुकानदारांना वितरित करण्याचे काम सुरू झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
प्रशासनाकडे तक्रार
स्वस्त धान्य दुकानातून लोकांना चांगले धान्य मिळायला हवे. मात्र, गोदामातून किडलेला व सडलेला गहू दिला जातो. यामुळे आम्ही धान्य घेण्यास नकार दिला. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली जाईल. विश्वनाथ ढवळे, तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, जालना

नमुने मागवले
शासकीय गोदामात आलेल्या गव्हाचे नमुने मागवले आहे. मात्र, खराब गव्हाबाबत माहिती आपल्याकडे आली नाही. तरी गोदामातून गव्हाचे नमुने मागवले आहेत. अहवाल मागवून पुढील कार्यवाही करू. अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी.