आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून दहावीची पुनर्परीक्षा, फॉर्म न भरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल परीक्षेची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ५४ विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा फॉर्म भरता आला नाही त्यांनाही परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव सचिन जगताप यांनी दिली.

राज्य सरकारने यंदापासून दहावी परीक्षेत नापास झालेल्या मुलांची परीक्षा नियोजित वेळेच्या अगोदर घेऊन त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणारी ही परीक्षा जुलैमध्येच घेण्यात येत आहे. शिक्षण मंडळाच्या स्थापनेनंतर १९७५ पासून नापास विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्यात येत होती. यंदा प्रथमच जुलै महिन्यात ही परीक्षा होत आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाच्या लातूर विभागाने तयारी पूर्ण केली असून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे गठ्ठे रवाना करण्यात आले आहेत. लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यासाठी ३६ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रावरून १२ हजार ७६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक आणि आठ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार असल्याने केंद्रावर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लातूर जिल्ह्यासाठी जिल्हा दंडाधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. केंद्र परिसरात पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्रितरीत्या प्रवेश घेता येणार नाही. लातुरातील व्यंकटेश माध्यामिक विद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय आणि जिल्ह्यातील रवींद्रनाथ टागोर विद्यालय (अहमदपूर), जगत जागृती विद्यामंदिर (चाकूर), मुक्तेश्वर विद्यालय (औसा), जिल्हा परिषद मुलांचे हायस्कूल (निलंगा), महाराष्ट्र विद्यालय(निलंगा) आणि लाल बहादूर शास्त्री विद्यालय (उदगीर) या केंद्रावर ही परीक्षा होत आहे.

हेल्पलाइन आणि समुपदेशक
परीक्षेसंदर्भात अडचणी सोडवण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर दहावीसाठी ०२३८२-२५१७३३ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. तसेच लातूर जिल्ह्यासाठी समुपदेशक म्हणून एम. एस. दानाई (९४२२०१५१५२) आणि डी. डी. जाधव (९९२३६४७०७८), उस्मानाबादसाठी के. बी. पवार (९४२१३६१५४३ ) व एस. जे. चंदनशिवे (९५२७२९६६०५) आणि नांदेडसाठी बी. एम. कच्छवे (९३७१२६१५००) यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडचणीविषयी उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे. दहावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याने आपल्या घराजवळील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर अर्धा तास जायचे. त्यानंतर केंद्रावरील पर्यवेक्षकांना परीक्षा फॉर्म वेळेत भरता न आल्याची माहिती द्यायची. पर्यवेक्षक तशी नोंद घेऊन त्याला इमर्जन्सी बारकोड देऊन परीक्षेला बसण्याची संधी देणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...