आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reactions Of Shivsena And Congress Leaders Over Confidence Motion

सत्तेसाठी भाजपची राष्ट्रवादीशी सोयरीक, विश्वासदर्शक ठरावावर सेना, काँग्रेसच्या तिखट प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांच्या फैरीवर फैरी झाडणारे, सत्तेत आल्यास सिंचन घोटाळा केलेल्यांना जेलमध्ये टाकू म्हणणा-या भाजपनेच सत्तेसाठी राष्ट्रवादीशी सोयरीक केली आहे. ज्या विश्वासाने जनतेने त्यांना निवडून दिले त्यांचा विश्वासघात भाजपने केला, अशा संतप्त प्रतिक्रिया शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिका-यांनी व्यक्त केल्या.
अत्यंत चुकीचा पायंडा
विधानसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासात अशा पद्धतीने कधीही विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान झालेले नाही. यावरून भाजपकडे सरकार चालवण्यासाठी आवश्यक बहुमत नसल्याचेच सिद्ध झाले. सभापतींनी मतविभाजनापूर्वीच आवाजी मतदानाचे सोपस्कार करून मतदान घेतले. हा अत्यंत चुकीचा पायंडा पडला आहे. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
बाहेरून उघड पाठिंबा
भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा आहे हे उघड आहे. त्यासाठी आवाजी मतदानाची खेळी करण्याची गरज नाही. अध्यक्षांच्या निवडीसाठी दाखल झालेले काँग्रेस, शिवसेनेचे अर्ज मागे घेण्यात आले. अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली. त्या गोंधळात विश्वासदर्शक मतदानाची मागणी करण्याचे विरोधक विसरले. अध्यक्षांनी आवाजी मतदान घेतले. त्यात गैर नाही.
श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब गोरठेकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी, नांदेड

राष्ट्रवादीला झाकण्यासाठी नाही
भाजपचे सभागृहात आजही बहुमत होते. पुढेही कायम राहील. आजच विषय संपला अशातला भाग नाही. यापुढे सभागृहात अनेक विषयांवर मतदान घ्यावे लागणार आहे. तेव्हा तेव्हा बहुमत आहे की नाही हे सिद्ध होईलच. राष्ट्रवादीला झाकण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी आवाजी मतदान झाले नाही. - चैतन्यबापू देशमुख, माजी महानगर अध्यक्ष, भाजप, नांदेड

अत्यंत तडकाफडकी कार्यवाही
भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे हे पटलावर उघड होऊ नये म्हणूनच भाजपने हा मार्ग अवलंबला ही शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्षांना आम्ही व्होटिंगची मागणी केली; परंतु त्यांनी अत्यंत तडकाफडकी कार्यवाही करत आवाजी मतदानाचा निर्णय जाहीर केला. हे अल्पमतातील सरकार आहे. त्यांनी पटलावर बहुमत सिद्ध करण्याची गरज होती. - डी. पी. सावंत, काँग्रेस आमदार, नांदेड

स्थिर सरकारसाठी पाठिंबा
आम्हाला कोणी पाठिंबा मागितला नव्हता; पण महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलेले होते. पक्षाची भूमिका पवारसाहेबांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहे. - अशोक डक, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी, बीड

पाठिंबा घेणे गैर नाही
सरकार स्थापनेसाठी कोणाचा पाठिंबा गरजेचा असेल व तो मिळत असेल तर तो घेण्यात गैर काहीच नाही. आवाजी मतदानावरून भाजपने खेळी केली आहे, असा कोणी त्याचा अर्थ लावत असेल तर तो चुकीचा आहे. - नागनाथ निडवदे, जिल्हाध्यक्ष, भाजप, लातूर

खरा चेहरा समोर आला
नैतिकतेचा नगारा पिटणारा भाजप वेळ आल्यास नैतिकतेलाच कसा पायदळी घेतो हे या घटनेने तमाम महाराष्ट्राला कळले आहे. भाजपचे खायचे दात एक व दाखवायचे एक असा या पक्षाचा चेहरा यामुळे उघड झाला आहे. लोकभावनेला अशा वर्तणुकीने ठेच लागली आहे. - अॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, लातूर

जनतेचा विश्वासघात केला
राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांच्या फैरीवर फैरी झाडणारे, सिंचन घाेटाळा काढून सत्तेत आल्यास असा घोटाळा केलेल्यांना जेलमध्ये टाकू म्हणणा-या भाजपने सत्तेसाठी राष्ट्रवादीशी सोयरीक केली आहे. ज्या विश्वासाने जनतेने त्यांना निवडून दिले त्यांचा विश्वासघात भाजपने केला आहे. सत्तेसाठी काहीही, हाच भाजपचा चेहरा असून या घटनेने महाराष्ट्राच्या जनतेला या पक्षाची खरी उंची कळली आहे. - सुभाष काटे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना, लातूर

मुंडे असते तर असे झाले नसते
बहुमत सिद्ध होत नसल्यामुळे आवाजी मतदान घेऊन फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. यामुळे लोकप्रतिनिधींचे महत्त्व कमी झाले असून लोकशाहीची हत्या झाली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर असे झाले नसते. भाजपने राष्ट्रवादीच्या सहमतीने सेनेसोबतची युती तोडली आहे. - ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार, शिवसेना

भाजप सरकारची हुकूमशाही
गुप्त मतदान विरोधात जाण्याची शक्यता होती. यामुळे भाजपने आवाजी मतदान घेऊन विश्वासदर्शक ठराव मांडला. ही भाजपची हुकूमशाही असून जनतेची दिशाभूल आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केल्यास सरकारला भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास अडचणी येणार आहेत. - राजाभाऊ शेरखाने, जिल्हा संघटक, काँग्रेस, उस्मानाबाद

जनतेच्या डोळ्यात धूळफेक
राजकारणाच्या दृष्टीने हा वाईट प्रकार आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी जी प्रक्रिया घेणे आवश्यक आहे, ती न करताच सरकारने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया चुकीची असून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. यामुळे आगामी काळात लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. - अप्पासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, उस्मानाबाद

विकासाच्या दृष्टीने पाठिंबा
महाराष्ट्रातील विकासाच्या दृष्टीने भाजप स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनेही महाराष्ट्रातील विकासाच्या दृष्टीने भाजप सरकारला पाठिंबा देण्यासाठी तयारी दाखवली आहे. लोकशाही पद्धतीने अावाजी मतदान घेऊनच विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर केला आहे. - सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, उस्मानाबाद

भाजपची वाटचाल योग्यच
बहुमत असल्यावर आवाजी मतदान घेतले जाते. यामध्ये भाजपला बहुमत मिळाले. यावर विश्वास नसेल तर तो लोकशाहीवरच विश्वास नाही, भाजप सरकारची वाटचाल योग्यच आहे. नितीन काळे, जिल्हाध्यक्ष, भाजप