आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, मंत्र्यांच्या गाडीवर पायताण भिरकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी (दि.चार) संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. यात पालकमंत्री सुरेश धस यांच्या गाडीवर आंदोलनकर्त्या युवकाने बूट (पायताण) भिरकावला. या प्रकाराने शिवाजी पुतळा परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी त्या युवकासह 16 जणांना ताब्यात घेतले.
उपमुख्यमंत्री अजित पवार सेलू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यानिमित्त मंगळवारी (दि.चार) सकाळी परभणीत सावली विर्शामगृहावर दाखल झाले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्याचे ठरवले. त्यासाठी साडेदहाच्या सुमारास ते वसमत रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले.
गाड्यांच्या ताफ्यात उपमुख्यमंत्री पवार एका खासगी गाडीत बसले होते. हा ताफा शिवाजी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना उपमुख्यमंत्री पवार यांचे वाहन पुढे निघून गेले. मात्र, दिव्याच्या गाड्या पुतळ्याजवळ असताना तेथेच मागील पाच दिवसांपासून आंदोलनास बसलेल्या कार्यकर्त्यांनी अचानक त्या अडवण्यास सुरुवात केली. संतप्त झालेल्या माणिक ढाकरगे या युवकाने पायातील बूट काढून पालकमंत्री सुरेश धस यांच्या गाडीवर भिरकावला. या प्रकाराने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली.
त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, मारुती बनसोडे, विलास लुबाळे व अन्य पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री पवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली. दरम्यान, बूट भिरकावण्याचा प्रकार व गाड्या अडवल्याप्रकरणी 16 जणांवर नवा मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.