आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी निवृत्त जमादार एसपींच्या दारातच बेशुद्ध!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- हॉकीतील राष्ट्रीय खेळाडू मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करण्यासाठी गेलेला सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक पिता रविवारी मानसिक ताणामुळे येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात बेशुद्ध झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नातेवाईक पोलिसांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नखीम अब्दुल्ला शेख असे त्या पित्याचे नाव असून अर्धांगवायूच्या आजारपणात शेख यांची न्यायासाठी अशी फरपट सुरू आहे. 

बीड शहरातील शहेनशहानगर येथील नखीम शेख यांना मुली आणि दोन मुले असून यापैकी अलीम हा हॉकीतील राष्ट्रीय खेळाडू आहे. मुलाच्या पत्नीने पतीसह सासू-सासऱ्यांवरही छळाचा गुन्हा नोंद केला होता. याच प्रकरणात व्यग्र असताना मे २०१६ रोजी अलीमचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याची चौकशी करावी आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांवर गुन्हे नोंद करावेत या मागणीसाठी पोलिस जमादार म्हणून सेवानिवृत्त झालेले नखीम शेख यांनी उतारवयात लढा सुरू केला. अर्धांगवायूने जखडलेले, बोलताही येत नाही अन् चालताही अशाही स्थितीत नखीम यांना त्यांच्या पत्नीची साथ मिळाली. 

मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी त्यांच्या पोलिस ठाण्यात चकरा सुरू झाल्या. निवेदने दिली, भेटी घेतल्या, विनंती केली; पण कारवाई शून्य. न्याय मिळत नसल्याने रविवारी पत्नी खैसर बेगम यांना सोबत घेत दांपत्य थेट पोलिस अधीक्षकांच्या भेटीला आले खरे, परंतु रविवार असल्याने अधीक्षक जी. श्रीधर कार्यालयात नव्हते. इतरही अधिकारी सुटीवरच होते. एसपींच्या कक्षाबाहेर हे दांपत्य बसले; पण पोलिसांकडून साधी विचारपूसही झाली नाही. पक्षाघात असलेल्या नखीम यांना हा अपमानच वाटला असावा, पण बोलताही येईना. ताण असाहाय्य होऊन एसपींच्या कक्षाबाहेरच ते बेशुद्ध पडले. डोक्याला दुखापत झाली असून नातेवाईक पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

पोलिस कुटुंबावर दुर्दैवी वेळ 
नखीमयांनी आयुष्यभर पोलिस दलात सेवा दिली. त्यांचा दुसरा मुलगाही सोलापूर पोलिसांत आहे. पाेलिस कुटुंबावर अशी वेळ येणे दुर्दैवी असल्याचे मत जिल्हा रुग्णालयातही उपस्थितांमधून व्यक्त होत होते. १६ जानेवारी रोजीच त्यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात निवेदन दिले होते. 
 
उप अधीक्षकांनी घेतली भेट 
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक गणेश गावडे यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन नखीम यांची भेट घेऊन विचारपूस केली. याप्रकरणी चौकशी करून योग्य त्या कारवाईबाबत संंबंधितांना सूचित करण्यात येईल, असे गावडे यांनी सांगितले. 

न्यायासाठी लढत राहणार 
मुलाच्यामृत्यूलाकारणीभूत ठरलेल्या लोकांवर कारवाई करावी. वृद्धापकाळात आमच्यावर न्यायासाठी झुंजण्याची वेळ आली असून न्याय मिळेपर्यंत मी लढत राहणार.
- खैसर बेगम, मृत अलीम यांची आई
बातम्या आणखी आहेत...