आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद शहरात वक्फच्या जमिनीवर धनदांडग्यांचा डोळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - वक्फ बोर्डाच्या जागा बळकावणा-या उस्मानाबाद शहरातील धनदांडग्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दणका दिल्यानंतर काही दिवसांतच या जागेवर पुन्हा पाय पसरण्यात आले आहेत. वक्फ बोर्डाचे नरमाईचे धोरण, जिल्हा प्रशासनाचा संपलेला दबदबा आणि धनदांडग्यांच्या दादागिरीमुळे प्रार्थनास्थळांच्या मोक्याच्या जागा ताब्यातून जात आहेत.


जिल्ह्यात वक्फ बोर्डाची हजारो एकर जमीन आहे. दर्गा, मशीद, इदगाह, कब्रस्तान तसेच मठाची हजारो एकर जमीन नियमबाह्य कागदपत्रांच्या आधारे फेरफार करून बळकावण्यात आली आहे.प्रार्थनास्थळाच्या जमिनी इनामदाराच्या ताब्यातून किंवा इनामदारासोबत संगनमत करून बळकावण्यात आल्या असून या जमिनीचे मोल कोट्यवधी रुपये आहे. उस्मानाबाद शहरातील महत्त्वाच्या भागात असलेल्या या जमिनी अनेक वर्षांपूर्वीच नियम धाब्यावर बसवून बळकावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या जमिनीची कार्यालयातून रीतसर नोंदणी होत आहे.


या जागेवर टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. तसेच प्लॉटिंगची विक्री सुरू आहे. सुरुवातीला बाँड पेपरवर नोटरी करून जागेची विक्री झाली. त्यानंतर या जमिनीची नोंद सातबा-यावरही घेण्यात आली आहे. हा प्रेकार लक्षात आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरातील सुमारे 13 प्रकरणांत फेरफार रद्द ठरवले. त्यानंतर काही प्रकरणांत विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आले. मात्र, प्रकरणात अंतिम निर्णय नसतानाही काही जणांनी जागेवर बांधकाम सुरू केले असून जागेचे व्यवहारही सुरू आहेत.


प्रशासन सुस्त
प्रार्थनास्थळ किंवा कब्रस्तानच्या या जमिनीवर वक्फ बोर्डाचे नियंत्रण आहे. मात्र, इनामदारांना सेवेसाठी दिलेल्या या जमिनीचे काय झाले, याचा शोध वक्फ बोर्डाकडून घेण्यात येत नाही. बहुतांश प्रकरणात स्थानिक नागरिकांकडून तक्रारी करण्यात येतात. दिलेल्या जमिनीचे उद्देश पाळले जातात किंवा नाही, याची माहिती घेऊन बळकावलेल्या जमिनी पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत.


ही आहे वक्फची जमीन
शहरातील जामा मशीद कब्रस्तान इदगाहच्या सेवेसाठी देण्यात आलेली 103, 104, 118, 119, 164, 571, 518, 519, 520, 521, 760, 761, 762 या सर्व्हेमध्ये सुमारे 214 एकर 21 गुंठे जमीन असून हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी रहे यांच्या सेवेसाठी 246, 284, 285, 355, 356, 427, 428, 459, 460, 462, 463 या सर्व्हेमध्ये 268 एकर, 16 गुंठे जमीन आहे. नळदुर्गमध्ये जामा मशीद आणि दर्ग्याची सुमारे 500 एकर जमीन आहे.


तक्रार करणार
उस्मानाबाद शहरातील दिलीप देशमुख यांच्या बांधकामाला स्थगिती असूनही त्यांनी काम सुरू केले आहे. त्यांच्या कामाचे फोटो घेतले असून वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबतची तक्रार करण्यात येईल. वक्फ बोर्डाने कळवूनही रजिस्ट्री कार्यालयाने 119 सर्व्हेमधील जमिनीची खरेदी-विक्री झाली आहे. याबाबत शासनाकडे तक्रार करू.
महंमद शेख, जिल्हा वक्फ अधिकारी


यंत्रणेचा गैरवापर
वक्फ बोर्डाच्या जमिनीची माहिती स्थानिक कार्यालयाकडून प्रसिद्ध केली जाते. शिवाय या जमिनीचे व्यवहार करू नयेत, असे नागरिकांना आवाहन करून सांगितले जाते. वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत सर्व्हे नंबर देऊनही नोंदणी कार्यालयाकडून ही बाब दुर्लक्षित केली जाते. रीतसर फेरफार होऊन या जमिनीची नोंद सातबारावर केली जाते. या सगळ्या गैरप्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर होतो.