आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमधील मुलाच्या भेटीचे स्वप्न अधुरेच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- खूनप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्याने औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या येथील सय्यद कुटुंबातील सदस्यांवर काळाने बीडजवळ घाला घातला आणि भेट घेण्याचे स्वप्नही अधुरेच राहिले.

शहराच्या मंगळवारपेठ भागातील बांधकाम मिस्त्री राम बाबूराव मासाळ यांचा अंबलवाडी घाटात धारदार शस्त्राने खून झाला होता. या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. ए. गायकवाड यांनी चौघांना दोषी ठरवून 24 डिसेंबर 2013 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या आदेशानंतर चौघांची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सय्यद जावेद सय्यद सलीम याला भेटण्यासाठी रविवार पेठेतून वडील सय्यद सलीम सय्यद अब्बास व अन्य अकरा जण असे सय्यद कुटुंबीय गुरुवारी पहाटे तवेरा जीपने अंबाजोगाईहून औरंगाबादला निघाले. रस्त्यात बीडहून पुढे जाताना पेडगावजवळ उभ्या ट्रकवर तवेरा जीप आदळली. चालक न मिळाल्याने सय्यद सलीम हेच जीप चालवत होते. या अपघातात सय्यद सलीम सय्यद अब्बास (54) यांच्यासह आई, भाऊ, चुलता, चुलती व अन्य नातलग असे आठ जण ठार झाले.

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी सकाळी नऊची वेळ असल्याने सय्यद कुटुंबीय गुरुवारी पहाटेच निघाले; परंतु मुलाची भेट होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे रविवारपेठ भागात आक्रोश सुरू झाला. जुन्या पिढीतील डॉ. जानुल्ला यांचा मुलगा व दोन पुतण्यांचे हे कुटुंब होते.

रिफ्लेक्टर नसल्याने अपघात
तवेरा चालवणारे सय्यद सलीम सय्यद अब्बास यांना गुरुवारी पहाटे पेडगाव शिवारात महामार्गावर पंक्चर झालेला ट्रक अंधारात दिसलाच नाही. त्याचबरोबर ट्रकच्या मागे रिफ्लेक्टरही लावण्यात आलेले नव्हते, त्यामुळे हा अपघात घडला.

अझरुद्दीनने गमावली पत्नी, मुलगी
तवेरा-ट्रकच्या भीषण अपघातात लातूर शहरातील सोमवती गल्लीत राहणारे शेख अझरुद्दीन शेख सत्तार हे बचावले असले तरी त्यांची पत्नी शेख जेबा शेख अझरुद्दीन व दोन वर्षांची मुलगी झुबिया शेख या दोघी माय-लेकींचा मृत्यू झाल्याने अझरुद्दीनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सय्यद कुटुंबातील सय्यद सलीम यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधारच गेला आहे.

घटनास्थळी रक्ताचा सडा
बीड-गेवराई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या अपघातात तवेरा ट्रकवर इतक्या वेगात आदळली की, तवेरातील सहा जण जागीच ठार झाले. तवेरा चेपली गेल्याने तीन मृतदेह के्रनच्या साहाय्याने काढावे लागले. अपघातातील सय्यद अलिशा (7) व झुबिया शेख या दोन मुलींचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

पोलिस अधीक्षकांची भेट
अपघातस्थळी पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती पंडित, शहर वाहतूक शाखेचे सय्यद मजहर, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ इंगळे यांनी भेट देऊन राष्ट्रीय महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.