आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा रुग्णालयात; पैसे आणायला जाणाऱ्या वडिलांचा अपघातात मृत्यू; जीप जाळण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- आजारपणामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाला सुटी दिल्यानंतर डॉक्टरांचे बिलाचे पैसे आणून देण्यासाठी गावाकडे निघालेल्या शेतकरी पित्याचा जीपच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील भेंड शिवारात गुरुवारी दुपारी दीड वाजता घडली. रावसाहेब गंगाधर राठोड असे मृत पित्याचे नाव आहे. अपघातानंतर काही वेळ या मार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.   

तालुक्यातील मारफळा गावाजवळील राठोड तांडा येथील  शेतकरी रावसाहेब गंगाधर राठोड (३२ ) यांचा मुलगा रोहन राठोड याला  बुधवारी (१० मे) तालुक्यातील सिरसदेवी येथील खासगी  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी उपचारानंतर मुलाची सुटी झाल्यानंतर डॉक्टरांचे बिल द्यायचे असल्याने रावसाहेब हे  दुचाकीवरून (एमएच ४५ क्यू ४९३३) राठोड तांड्याकडे  निघाले होते. कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील  भेंड शिवारात त्यांची दुचाकी आली तेव्हा समोरून येणाऱ्या जीपचालकाने (एमएच ४४ जी २४८३) दुचाकीला समोरासमोर  धडक दिली. या अपघातात राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तो जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. 
 
सायंकाळी सहा वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. तलवाडा ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक आर.आर.गडवे, एस.बी.वरकड यांनी भेट दिली.
 
काही काळ तणावाचे वातावरण...
भेंड शिवारात भरधाव जीपने दुचाकीला समोरून धडक दिल्याने या भागातील काही लाेकांनी ही जीप जाळण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तलवाडा  पोलिसांनी भेट दिली. ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.
बातम्या आणखी आहेत...