आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्निंग वॉकला जाणार्‍या व्यापार्‍यास चिरडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - ‘मॉर्निंग वॉक’साठी निघालेल्या किराणा दुकानदारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने सोमवारी पहाटे चिरडले. घटनेनंतर एक तास पोलिसांसह अन्य कोणीही न आल्याने संतप्त नागरिकांनी दोन तास राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला. त्यानंतर जमावाने पोलिस उपअधीक्षकांच्या गाडीसह दोन ट्रकवर दगडफेक केली. दोन तास महामार्ग बंद पाडल्याने दोन्ही बाजूने तीन हजारांवर वाहने अडकली.

गोवर्धन हरिभाऊ बहिर (रा. शाहूनगर, 45) असे अपघातातील मृताचे नाव आहे. बहिर यांचे बीड शहरातील शाहूनगर भागात गोवर्धन किराणा डिपार्टमेंट दुकान आहे. ते रोज पहाटे फिरण्यासाठी जात असत. सोमवारी पहाटे सहाच्या दरम्यान जालना रोडने विठाई हॉस्पिटल रोडकडे ते जात होते. समोरून येणार्‍या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच चिरडून मृत्यू झाला. सात वाजता परिसरातील नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. पोलिस यंत्रणा वेळेवर न आल्याने तसेच वळणरस्त्याचे काम रखडल्याने संतप्त जमावाने सकाळीच चक्का जाम आंदोलन सुरू केले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांना भेटून वळणरस्त्याच्या प्रश्नी चर्चा करू, असे आश्वासन पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी जमावास दिले. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ लागला.