आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डे चुकवताना कार नदीपात्रात कोसळली, तीन जणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई, केज - जिल्ह्यातील चकलांबा फाटा व सारूळ या दोन ठिकाणी बुधवारी पहाटे दीड वाजता झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला. चकलांबा फाटा येथील शेवगाव-गेवराई मार्गावरील लेंडी नदीच्या पुलावरून तलवाड्याकडे जाणारी कार थेट नदीच्या पात्रातच कोसळल्याने तीन जणांचा, तर सारूळ येथे जीप व अ‍ॅाटोच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

वसई येथे वास्तव्यास असलेले तलवाडा येथील शेख कुटुंबीय बुधवारी पहाटे राक्षसभुवन येथे दहाव्याचा कार्यक्रम असल्याने गेवराई तालुक्यातील तलवाड्याकडे कारने (एमएच ४८ पी ५१३८) निघाले होते. त्यांची कार चकलंबा फाट्याजवळ आली असता शेवगाव-गेवराई मार्गावरील पुलावर खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार पुलावरून लेंडी नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. या अपघातात कारमधील शेख इक्बाल शेख हबीब (३५), शेख हासीनाबी शेख चाँद (५५), जकिया बेगम शेख शब्बीर (४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शब्बीर शेख (४५), सिराज शेख हबीब (४०), मजू शेख (७ ) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गेवराई ठाण्याचे पोलिस जमादार डी. वाय. मोरे, पोलिस जमादार एस. पी. सय्यद, पोलिस नाईक पी. टी. मंजुळे यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला.

जीप-अ‍ॅाटो अपघातात दोघांचा मृत्यू
केज-बीड राज्य मार्गावरील सारूळ गावाजवळ अ‍ॅाटो व जीपच्या अपघातात अ‍ॅाटोमधील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री दीड वाजता झाला. पुण्याहून केज तालुक्यातील कोरेगावकडे अॉटो (एमएच २३ एडी १४४९) निघाला होता. याच वेळी केजहून बीडकडे जाणार्‍या जीपने (एमवाय १७ व्ही १३८९) अ‍ॅाटोला जोराची धडक दिली. या अपघातात अ‍ॅाटोमधील कारेगाव येथील उत्तरेश्वर लहू तांदळे आणि अण्णासाहेब सुधाकर तांदळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जीपचालकाने जीप घटनास्थळीच सोडून पोबारा केला. केज पोलिसांनी जीपचालकावर गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब लाकाळ करीत आहेत.

बसखाली सापडलेली दुचाकी पेटली; एक ठार
हिंगोली | बसखाली सापडलेल्या दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. पुसदहून नांदेडला जाणारी बस (एमएच ४० ए ९६६९) डोंगरकडा येथून पुढे जात असताना हा अपघात झाला. यात निमगावचा प्रकाश राठोड हा जागीच ठार झाला. तर अशोक चव्हाण हा जखमी झाला.