आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राधिकरणाच्या ठेक्यामुळे पैठणकरांमध्ये तीव्र संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण शहराचा चेहरामोहरा बदलून नवीन ओळख निर्माण होईल, असे काम पैठण - आपेगाव विकास प्राधिकरणाद्वारे होणे अपेक्षित असताना, केवळ ठेकेदारधार्जिणे प्रशासन, पुढाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे प्राधिकरणाच्या २२२ कोटींच्या निधीचा योग्य विनियोग न होता शहरातील रस्ते पुन्हा निकृष्ट दजार्चे होत आहेत.
तब्बल १८ कोटी रुपये खर्चूनही निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा नगर परिषदेने काम दिल्याने पैठण तालुक्यातील जागृत नागरिकांनी ठेकेदार बदलण्याची मागणी करत केवळ आश्वासन देणाऱ्या पुढारी व प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासनाने पैठण प्राधिकरणाचे काम पुढाऱ्यांचा दबाव व स्थानिक ठेकेदारांना हाताशी घेऊन करू नये, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

त्या ठेकेदाराला पुन्हा काम हे वृत्त दैनिक ‘दिव्य मराठी’त प्रकाशित होताच पैठणमधील नागरिकांनी प्रशासनाबरोबर येथील पुढाऱ्याविरोधात संताप व्यक्त केला. अनेक वर्षांपासून चारनिया कन्स्ट्रक्शन पैठणमधील रस्त्यांची कामे घेते, या ठेकेदाराचे सर्व पक्षातील नेत्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने, त्या ठेकेदारा व्यतिरिक्त दुसऱ्या ठेकेदारास कामे दिली जात नाहीत, असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
आमदार संदिपान भुमरे यांनी केली होती तक्रार

१८ कोटींपेक्षा अधिक खर्च करून पैठणच्या उद्यान रस्त्याचे काम सुरू असतानाच तो संपूर्ण रस्ता दुभंगून अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनला होता. याबाबत त्यावेळी आमदार संदिपान भुमरे यांनी तक्रार केली होती. मात्र आता पुन्हा याच ठेकेदारास काम देण्यात आल्याने, हाच ठेकेदार का? असा जाब आमदारांनी विचारणे क्रमप्राप्त असताना, आत तेच काम चांगल्या प्रकारे होईल असे सांगत असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिक विचारात पडला आहे.
^पैठण येथील राजकीय पुढारी प्राधिकरणाचे श्रेय घेण्यात दंग असून कामाच्या दर्जावर ते बोलताना दिसत नाही. आधीचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम पाहता, पुन्हा त्याच ठेकेदारास काम देऊन प्रशासनाने चूक केली असली तरी आता तरी कामाचा दर्जा सुधारेल, अशी अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, आपेगाव संस्थान
^यापूर्वीची निकृष्ट कामे पाहता आता तरी कामाचा दर्जा सुधारावा, प्राधिकरणाच्या निधीची वाट लावण्याचे काम होता कामा नये. कांतराव औटे, भाजप नेते
चारनिया कन्स्ट्रक्शनकडून काम काढून घेण्याची मागणी

पैठणमधील पुढाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी आपल्या टक्केवारीच्या नादात प्राधिकरणाच्या करोडोच्या निधीची वाट लावत आहे. त्यामुळे करोडोचा निधी खर्चूनही प्राधिकारणाची कामे निकृष्ट दर्जाची होत आहे. पुन्हा त्याच ठेकेदारास काम दिले गेल्याने पुढील काम कसे होईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात यावे अशी मागणी होत आहे.