आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसूतीच्या नव्हे, खड्डेमय रस्त्याच्या यातनांमुळे ६ अर्भकांचे गेले बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब - तालुक्यातील बोरवंटी ते मंगरूळपाटी रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यामुळे गुरुवारी(दि.१८) प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलेच्या पोटातील अर्भकाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समाेर आले आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यांत या रस्त्यावरून रुग्णालयात प्रसुतीसाठी जाणाऱ्या ६ महिलांच्या पोटातील अर्भकांना जीव गमवावा लागल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारीतून पुढे आले आहे. वयोवृध्दांचे होणारे हाल, रुग्णांच्या वेदना वेगळ्याच. या धक्कादायक प्रकारानंतरही जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग डोळेझाक करीत असल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे.

बोरवंटी या एक हजार लोकसंख्येच्या गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मंगरूळ पाटी ते बोरवंटी गाव असा रस्ता आहे. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत आहे. तो चार किलोमीटर असून, यामध्ये केवळ एक किलोमीटरचा रस्ता डांबरी आहे. अन्य तीन किलोमीटर अत्यंत खराब आहे. या रस्त्यावरून पायी जाणेही कठीण आहे. त्यामुळे गाडीतून जाणे शक्य होत नाही. रस्ता खराब असल्यामुळे गावात कुठलेही गाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पायी ढोकीरोडपर्यंत जावे लागते. यासंदर्भात ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे वृध्दांपासून बालकांपर्यंत, रुग्णांनापासून गर्भवती महिलांपर्यंत सगळ्यांनाच यातना सहन कराव्या लागत आहेत.

गुरुवारच्या घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन रस्ता दुरूस्त करीत नसल्याने हेच का अच्छे दिन, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. निष्पाप, कोवळ्या जिवांना जग पाहण्यापूर्वीच मरण पत्करावे लागत अाहे. त्यासाठी केवळ खराब रस्ता कारणीभूत असून, हे सरकारकडून, प्रशासनाकडून पाप घडत असल्याची अत्यंत संतापजनक भावना गावकऱ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली आहे.

महिलेची प्रकृती गंभीर
गुरुवारी ज्योती चंद्रकांत मुरगे या महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर महिलेचीही प्रकृती नाजूक झाली आहे. तिच्यावर अंबाजोगाई येथे उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तहसीलदारांना निवेदन
बोरवंटी येथील रस्ता तात्काळ दुरूस्त करावा, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी गायकवाड, सरपंच स्वाती मुजमुले, चंद्रकांत मुरगे, मोहन कसबे आदींची नावे आहेत.

जुळ्यातील १ दगावले
मागील महिन्यापूर्वी अश्विनी सज्जन कांबळे या महिलेला प्रसुतीच्या वेदना होत असल्यामुळे दवाखान्यात घेऊन जाण्यात आले होते. उस्मानाबाद येथे प्रसुती झाल्यावर दोन जुळे बालक झाले होते. यातील एक बालक मृत जन्मले आहे.

ग्रामस्थ म्हणतात, सहा अर्भकांचा मृत्यू,
बोरवंटीतून दवाखान्यात घेऊन जात असताना गुरुवारी ज्योती मुरगे या महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला. यापूर्वी गावातील सहा महिलांना खड्डेमय रस्त्याच्या यातना सोसाव्या लागल्या. त्यात अर्भकांचा मृत्यू झाला. ज्योती मुरगे, अश्विनी कांबळे, देवकन्या मुरगे, प्राजक्ता भोईटे, हिना पठाणसह एका महिलेच्या अर्भकाचा मृत्यू झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...