आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांपूर्वी बनवला १७ लाखांचा रस्ता; पहिल्याच पावसात उखडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण तालुक्यात पाच दिवसांपूर्वी १७ लाख रुपये खर्चून बनवलेला बन्नीतांडा-वडगव्हाण येथील रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पैठण तालुक्यात पाच दिवसांपूर्वीच १७ लाख ९९ हजार रुपये खर्च करून बनवलेला रस्ता ठिकठिकाणी वाहून गेल्याने रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची बाब समोर आली आहे. पैठण तालुक्यातील वडगव्हाण परिसरात रस्ते नसल्याची अनेक वर्षांची नागरिकांची आेरड होती. याची दखल घेऊन आमदार निधीतून पाच दिवसांपूर्वी आमदार संदिपान भुमरे यांनी बन्नीतांडा-वडगव्हाण या दोन किलोमीटर रस्त्याला मंजुरी दिली. कामाचे उद््घाटन स्वत: आमदार भुमरे यांनी केले, परंतु संबंधित ठेकेदाराने हे काम निकृष्ट पद्धतीने केले. ठेकेदाराने परिसरातील विहिरीचे डबर व रस्त्याच्या बाजूचा भाग जेसीबीने उकरून मुरूम रस्त्याच्या कामात वापरून हे काम केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. अनेक वर्षांची मागणी आता कुठे पूर्ण झाल्याने नागरिकांनी आेरड केली नाही. परिणामी पहिल्याच पावसात रस्त्याचे पितळ उघडे पडले.

नागरिकांनी पाडले होत काम बंद.. : रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर हे काम प्रारंभीपासूनच बोगस होत असल्याने वडगव्हाण येथील नागरिकांनी काम बंद पाडले होते. मात्र, यापुढील काम चांगले केले जाईल, असे आश्वासन कंत्राटदारांनी दिल्याने पुन्हा हे काम सुरू करण्यात आले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष..
पैठण तालुक्यात बोगस रस्त्याचे काम काही नवीन राहिले नाही. बनवलेले अनेक रस्ते काही दिवसांतच उखडून जातात. कंत्राटदाराचे पेमेंट निघून जाते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. याविषयी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणीच बोलण्यास पुढे आले नाही.

कंत्राटदाराचा निष्काळीपणा भोवला
आमदार साहेबांकडे रस्त्याची मागणी केल्यानंतर रस्ता मंजूर केला. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी हे काम बोगस पद्धतीने केल्याने पहिल्या पावसात अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले. - विष्णू नरवडे, नागरिक

आमदार निधीतून केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा
अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने आमदार संदिपान भुमरे यानी आपल्या आमदार निधीतून वडगव्हाण गावासाठी अंदाजे १८ लाख रुपये खर्चाच्या रस्ताकामाला मंजुरी दिली. मात्र, रस्त्याचे काम करत असलेल्या कंत्राटदाराने आमदार निधीतून काम बोगस पद्धतीने केल्याने आमदार निधीचा वापर बोगस कामासाठी केला गेल्याचे समोर आले आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.