आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधीमंडळातील लक्षवेधीनंतर दक्षता पथक लागले कामाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - वैजापूर तालुक्यातील वैजापूर ते पुरणगाव, वैजापूर-गंगापूर, नागमठाण-काटेपिंपळगाव, नाशिक-येवला व वैजापूर-बेळगाव गोदावरी नदीवरील आहवा- मालेगाव नांदगाव, शिऊर ते श्रीरामपूर, तलवाडा ते जानेफळ या रस्त्यांच्या पुलाच्या कामाची मुंबई येथील रस्ते दक्षता पथकाने पाहणी केली.

या रस्त्यांच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. कामे न करता अधिकार्‍यांनी निधी लाटल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याअनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. दरम्यान, या पथकाने शहरातील वैजापूर-गंगापूर राज्यमार्गाची पायी पाहणी केली; परंतु या कामाचा कोणताही नमुना न घेता वरवर पाहणी करण्यात आली. त्यामुळे ही पाहणी सोपस्कारच ठरली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील विविध रस्त्यांची कामे न करता तत्कालीन स्थानिक वरिष्ठ अधिकार्‍यांनी निधी लाटण्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी लक्षवेधी मांडली. त्याची दखल घेत शासनाने उच्चस्तरीय अधिकार्‍यांचे पथक स्थापन केले. यात मुंबई येथील दक्षता पथकाचे उपविभागीय अधीक्षक अभियंता डेकाटे, उपअभियंता आराध्ये, उपअभियंता कुलकर्णी, पवार व शिंदे यांचा समावेश आहे. या पथकाने शुक्रवारी वैजापूर-गंगापूर या राज्यमार्ग, नागमठाण- काटेपिंपळगाव, वैजापूर-बेलगाव, नाशिक-येवला मार्गावरील पूल तसेच गोदावरी नदीवरील शिऊर - श्रीरामपूर मार्गावरील नाऊर येथील पुलाची पाहणी केली. या पथकाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते येवला नाकापर्यंत पायी पाहणी केली.

नेमके काय सिद्ध होणार?
या पथकासोबत शासकीय व निमशासकीय गाड्यांचा ताफा पाहून नागरिकही अवाक झाले. या पथकाने रस्त्यांची पाहणी करताना नमुने घेण्याऐवजी वरवरची पाहणी करून सोपस्कार पूर्ण केले. त्यामुळे या चौकशीतून नेमके काय सिद्ध होणार याबाबत शंका उपस्थित होत आहेत. माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलण्यासही अधिकार्‍यांनी नकार दिला. पथकासोबत असणार्‍या स्थानिक कर्मचार्‍यांना विचारले असता नमुने घ्यायला पाहिजे होते, मात्र त्यांनी तसे न केल्याने आमचाही नाइलाज झाल्याचे स्पष्ट केले.

देखरेखीसाठी खास पथक
या पथकासोबत आमदार बंब यांचे विश्वासू सहकारी असलेले खासगी अभियंता दीपक कोकाटे, संजय घोणकर, संदीप गायकवाड, संतोष बारगळ, नितीन गायकवाड यांचे खास पथक सोबतीला आहे. हे पथक ज्या ठिकाणी पाहणी करीत आहे, त्या ठिकाणची चित्रफीत आमदार बंब करून घेत आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांनी तपासणी कशी केली, हे स्पष्ट होईल.

कन्नड-नागद-अमळनेर राज्य रस्त्याचीही पाहणी
तालुक्यातील चाळणी झालेल्या रस्त्यांची राज्य शासनाच्या पथकाकडून तपासणी सुरू आहे. गुरुवारी या पथकाने कन्नड शहरातून जाणार्‍या कन्नड-नागद-अमळनेर या रस्त्याची तपासणी केली. चाळणी झालेल्या रस्त्यांची डागडुजी न करताच बिल उचलले, असा आरोप करत आमदार प्रशांत बंब व काही आमदारांनी या रस्त्याची तपासणी करून दोषींविरोधी कारवाई करण्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यानुसार दोन-तीन दिवसांपासून कन्नड तालुक्यातील रस्त्यांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे बांधकाम विभागातील अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. कन्नड - नागद -अमळनेर या राज्य रस्त्याची तीन वर्षांपासून दुरवस्था आहे. नवीन कन्नड शहरातील सुमारे अर्धी वस्ती या भागात आहे. ग्रामीण रुग्णालय, विविध कार्यालये, महाविद्यालये, जगप्रसिद्ध गौताळा अभयारण्य असून या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे नागरिक, पर्यटक त्रस्त होते. आता बांधकाम विभागाने बिले उचलूनही रस्ता दुरुस्ती केलीच नाही, ही माहिती राज्य पथकामुळे समोर आली आहे.