आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आचारसंहितेत अडकलेल्या बाह्यवळण रस्त्याला मुहूर्त!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शहरातून जाणार्‍या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहरात रोजच अपघाताला निमंत्रण मिळू लागल्याने आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा मुहूर्त शनिवारी अखेर सापडला ! लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिरेवाडी परिसरात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. आमदार बदामराव पंडित, बाजार समितीचे सभापती अरुण डाके, माजी आमदार सय्यद सलीम, विलास बडगे, कार्यकारी अभियंता वसंत बाविस्कर यांची प्रमुख उपस्थित होती. या वेळी पालकमंत्री क्षीरसागर म्हणाले की, शहरातून राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या जड वाहतुकीमुळे अपघातात रोजच निरपराध नागरिकांचे बळी जातात. अपघात रोखण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मिनी बायपासची घोषणा केली होती. त्यानंतर कामास मंजुरी मिळाली. निविदाही काढण्यात आल्या, कार्यारंभ आदेश निघण्याच्या वेळीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे बायपासचे काम रखडले.

आता बायपासच्या कामाचा प्रारंभ झाला असून दोन महिन्यांत 2300 मीटर रस्त्याचे काम आणि नदीवरील पुलाचे काम करण्यात येईल. या मिनी बायपास वन-वे वाहतुकीमुळे शहरातून वाहतूक कमी होईल. नागरिकांचा, वाहनधारकांचा सुरक्षेचा प्रश्न कमी होणार आहे. ग्रामीण भागातून आणि औद्योगिक वसाहतीस जोडून जात असलेल्या या मिनी बायपासमुळे वसाहतीमध्ये येणार्‍या वाहनांची गैरसोय कमी होणार आहे. नोंव्हेंबरपर्यंत रस्ता खुला होईल. जालना रोडवरील सारंग हॉटेलपासून होणारा मिनी बायपास हा जिरेवाडी, बहिरवाडी, कुर्ला रोड, एमआयडीसी रोड, नाळवंडी रोड, तेलगाव रोड, बार्शी नाका पुढे बार्शी रोड जाणार आहे.

नऊ किलोमीटर अंतराच्या या मार्गावरून औरंगाबादहून सोलापूरकडे जड वाहतुकीसाठी असणार आहे. साधारणत: नोव्हेंबर अखेरपर्यंत वाहतुकीस खुला होईल, असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. कुर्ला मोंढा ते जालना रोडदरम्यान सरासरी सतराहून अधिक शेतकर्‍यांच्या जागेमधून मिनी बायपास जात आहे. शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनी भूसंपादनाच्या आधी संमतीपत्र लिहून दिले आहेत. शासन स्तरावरून किमान संमतीपत्र देणार्‍या शेतकर्‍यांना पोचपावती द्यावी, अशी मागणी शेतकरी बाळासाहेब शेंडगे यांनी केली.
शहरात दुभाजकाचे काम
धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरालगतच बार्शी नाका ते लक्ष्मी टॉकीजदरम्यान संपूर्ण रस्त्यावर अखंड दुभाजक बसविण्यात येणार आहेत. या कामास देखील शासन स्तरावरून मंजुरी मिळविण्यात आली आहे. दुभाजकाच्या कामासाठी सव्वा कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्येच या मार्गावरील रस्ता दुभाजकाच्या कामासही प्रारंभ होणार आहे.
जयदत्त क्षीरसागर, पालकमंत्री.

डांबरीकरण अन् नदीवरील पुल
जालना रोड ते कुर्ला रोड 3.5 किलो मीटर त्यापैकी 1200 मिटर रस्त्याचे कामास जिल्हा नियोजनातून 2 कोटी मंजुर१त्यात खडीकरण, डांबरीकरण रस्ता व बिंदुसरा नदीवरील पुल या कामास 10 कोटीचा निधी मंजुर झाला आहे.