आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच्या प्रचारासाठी पतीने आणले रोड रोलर! ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज - बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार  अनेक फंडे वापरत आहेत.   केज तालुक्यातील  कासारी  ग्रामपंचायत निवडणुकीत  रोड रोलर हे निवडणूक चिन्ह असलेल्या सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणातील महिलेच्या पतीने    गावात मंगळवारी चक्क रोड रोलर आणून प्रचार केला.  

ग्रामपंचायत  निवडणुकीच्या प्रचारासाठी आता एकच दिवस उरल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६९० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ग्रामीण भागात सध्या  मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध प्रलोभने, आश्वासने देत आहेत.  केज तालुक्यातील  कासारी  येथे ग्रामपंचायतीची सरपंचासह नऊ सदस्य पदांसाठी निवडणूक होत आहे. सरपंच पदासाठी तिरंगी तर सदस्य पदासाठी दुरंगी लढत होत आहे. सरपंच पद हे खुल्या प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित आहे. पॅनलच्या गवळणबाई सुखदेव वायबसे, साखरबाई महादेव डोईफोडे व अपक्ष सत्यभामा सुभाष काकडे या उमेदवारांमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. गावातील सरपंच पदाच्या उमेदवार गवळणबाई वायबसे यांना निवडणुकीत  रोड रोलर हे चिन्ह मिळाल्याने त्यांचे पती सुखदेव वायबसे यांनी मंगळवारी कासारी येथे चक्क रोड रोलर आणून उभे केले.  गावात या रोड रोलरची पूजा करून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गावात उमेदवाराच्या पतीने रोड रोलर आणून प्रचार केल्याचा विषय  चर्चेचा ठरला आहे. 

निवडणूक चिन्ह घेऊन प्रचार
ग्रामपंचायत निवडणुकीत कपाट, कपबशी, टेबल, पंखा अशा गृहोपयोगी असलेल्या वस्तू उमेदवारांना निशाणी मिळाल्या आहेत. त्यामुळे या वस्तू घेऊन उमेदवार प्रचार करताना दिसून येत होते. मात्र रोड रोलर चिन्ह  मिळालेल्या उमेदवाराने गावात रोडरोलर आणून मतदारांचे लक्ष वेधल्याने केज तालुक्यात हा  चर्चेचा विषय बनला आहे.
बातम्या आणखी आहेत...