आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोराचा पाेलिसावर हल्ला, प्राण वाचवणाऱ्या पोलिस सहकाऱ्याला एसपींकडून 10 हजारांचे बक्षीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- घरफोडी जबरी चोरीतील आरोपीने पोलिसावर प्राणघातक हल्ला केला. मात्र, प्रसंगावधान राखून एका पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीचा हात धरून आपल्या सहकाऱ्याचे प्राण वाचवले. विक्की उर्फ तान्या नारायण जाधव (१९, लोहार मोहल्ला, जालना) असे हल्लेखोर आरोपीचे नाव असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याचे साथीदार फरार झाले. जालना येथील वनविभागाच्या बंद पडलेल्या शासकीय निवासस्थानात रविवारी हा थरार घडला. 

आराेपी विक्की हा दोन साथीदारांसोबत काहीतरी लुटमार करण्याच्या तयारीनिशी वनविभागाच्या बंद पडलेल्या शासकीय निवासस्थानात लपून बसल्याची मािहती एलसीबी पीआय राजेंद्रसिंग गौर यांना मिळाली. त्यानुसार गौर यांनी एक विशेष पथक पाठवून वनविभागाच्या परिसरात सापळा लावला आरोपींना चोहोबाजूंनी घेरले. सर्व पोलिस कर्मचारी पुढे-पुढे सरकत असताना हे आरोपींच्या लक्षात आले. दरम्यान, विक्कीने त्याच्याजवळील खंजीर प्रशांत देशमुख यांच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोबत असलेले विष्णु कोरडे यांनी प्रशांत देशमुख यांना बाजूला लोटून शिताफीने विक्कीचा हात धरला. यामुळे विक्कीने केलेला वार चुकला प्रशांत देशमुख यांच्यावरील प्राणघातक हल्ला टळला. 

याच घाई-गडबडीत विक्कीचे दोन सहकारी पळून गेले. दरम्यान, आरोपी विक्कीसह आकाश नाना पवार (१९) एका विधीसंघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे एक तलवार, एक खंजीर, मिरची पावडर, नायलॉन दोरी त्यांनी नुकतीच चोरलेली दुचाकी असा दरोडा टाकण्याच्या तयारीतील मुद्देमाल हस्तगत केला. तसेच सचिन सुभाष जाधव (कांबळे गल्ली) विशाल पवार (संभाजीनगर दोघे रा. जालना) हे पळून गेल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींवर गंभीर गुन्हे 
यातीलमुख्य आरोपी विक्की हा वयाच्या १४ व्या वर्षापासून घरफोडी, चोरीसारखे गुन्हे करत असून त्याच्यावर जवळपास २० चोरी, जबरी चोरी, घरफोडी दरोड्यासारखे गुन्हे दाखल आहेत. तर अन्य दोघेसुद्धा घरफोडी जबरी चोरीमध्ये फरार आहे. 

एसपी रामनाथ पोकळे, एएसपी लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राजेंद्रसिंग गौर, कर्मचारी प्रशांत देशमुख, संजय मगरे, सदाशिव राठोड, हिरामण फलटणकर, समाधान तेलंग्रे, सचिन चौधरी, विष्णु कोरडे , विलास चेके, चालक सुरेश पाटील यांनी ही कारवाई केली. दरम्यान, अटक आरोपींकडून विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

एसपींकडून कौतुक अन् बक्षीस जाहीर 
यात पीआय राजेंद्रसिंग गौर यांचे मार्गदर्शन उपयुक्त राहिले. यामुळे एसपी रामनाथ पोकळे यांनी गौर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक करून रोख १० हजार रूपये बक्षिस जाहीर केले. तसेच या कारवाईमुळे गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वासही व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...