आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुक्याचा फायदा घेऊन दरोडेखोराचे कोठडीतून पलायन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - विविध आरोपांखाली पोलिस कठोडीतील अट्टल दरोडेखोराने धुक्याचा फायदा घेऊन पलायन केले. हा प्रकार सोमवारी सकाळी चाकूर पोलिस ठाण्यात घडला.

बबल्या ऊर्फ अनिल शाहू पवार (रा. साळेगाव, ता. केज) असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर जिल्ह्यातील अनेक परमिट रूम, बिअर बारवर दरोडे टाकून लूट केल्याचे गुन्हे दाखल आहेत. चाकूर पोलिस ठाणे हद्दीतील आष्टामोड, औसा तालुक्यातील आशिव तसेच मुरूड येथील बिअर बार फोडून दरोडे घालणाऱ्या १० जणांना लातूर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्याच गुन्ह्यातील बबल्या ऊर्फ अनिल पवार पोलिसांना हवा होता. त्यानुसार पोलिसांनी त्याला १ जानेवारी रोजी सालेगाव येथील पारधी वस्तीवर धाड टाकून अटक केली होती. त्यानंतर त्यास पोलिस कोठडी मिळाली होती. सोमवारी त्याची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार होते. परंतु त्यापूर्वीच त्याने धूम ठोकली.
शौचालयाच्या खिडकीचे गज वाकवून पळाला बबल्या
सकाळी प्रचंड धुके पसरले होते. १० फुटांवरील काहीही दिसत नव्हते. त्या वेळी कोठडीत बंद असलेला बबल्या शौचासाठी म्हणून शौचालयात गेला. शौचालयाची दुर्गंधी येत असल्याने व धुके असल्याने पोलिसांची नजर आपल्यावर नाही, ही बाब त्याने हेरली. त्यानंतर त्याने शौचालयाच्या खिडकीचे गज वाकवून धूम ठोकली. पायात बेडी असताना तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याच्या अंगावर जीनची पँट व लाल शर्ट आहे. दरम्यान, ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. धुक्यात हरवलेला बबल्या सापडलाच नाही.

शोधासाठी चार टीम
-शोधासाठी चार टीम पाठवण्यात आल्या आहेत. शिवाय स्थानिक गुन्हे शाखचे सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांचेही पथक तपासावर आहे. तो पळाल्यानंतर परिसरातील उसाच्या फडातही त्याचा शोध घेण्यात आला.
एस. बी. जावळे, पोलिस निरीक्षक, चाकूर