आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 लाख लंपास करणारे दरोडेखोर तीन तासातच अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - कंत्राटदार माधवराव फड यांच्या फार्म हाऊसवर सहा दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दरोडा टाकून 11 लाखांचा ऐवज लांबवला. पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने हलवत परभणी-औरंगाबाद बसमधून पळून जात असलेल्या तिघांना अवघ्या तीन तासांतच अटक केली. फरार झालेल्या अन्य तिघांकडे दरोड्यातील रक्कम व दागिने असून सर्व दरोडेखोर मध्य प्रदेशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कंत्राटदार माधवराव फड यांचे उमरी फाट्याजवळ मोठे फार्म हाऊस असून तेथेच त्यांची बागायती जमीन आहे. फड यांच्यासह त्यांची पत्नी गयाबाई फड या फार्म हाऊसवरच वास्तव्यास आहेत. याठिकाणी तीन सालगडी, ड्रायव्हर, घरकाम करणार्‍या तीन महिला काम करतात. मंगळवारी पहाटे चिरेबंदी वाड्यासारख्या फार्म हाऊसच्या मागील दरवाजातून सहा जण आत घुसले. त्यांनी गयाबाईंच्या खोलीकडे मोर्चा वळवत दरवाजा उघडण्यास भाग पाडले. घरकाम करणार्‍या गोदावरीबाईने दरवाजा उघडताच त्या सहा जणांनी हिंदी भाषेतून तिजोरीच्या किल्ल्या मागितल्या. त्यांच्या हातात लाकडी काठय़ा होत्या. घाबरून गेलेल्या गयाबाईने कपाटाची किल्ली दिल्यानंतर त्यांनी चार लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम, एक किलो चांदी, सोन्याच्या पाटल्या, गंठण, कानातली फुले, मणिमंगळसूत्र असा एकूण 11 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळाले. बारा बोअरची बंदूकही चोरट्यांनी लांबवली. दुसर्‍या खोलीत असलेले कंत्राटदार माधवराव बाहेर पडले नाहीत. या प्रकाराची जाणीव झाल्याने त्यांनी तातडीने मोबाइलद्वारे परभणीतील त्यांचे जावई दिलीप मुरकुटे यांना माहिती दिली. ते काही वेळेतच दाखल झाले. त्या वेळी क्रुझर जीप (एमपी 09 बीसी 7256) ने हे चोरटे पळून जात होते. मुरकुटे यांनी गोळीबार केला. परंतु चोरटे फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह दैठणा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक फसियोद्दीन शेख व कर्मचारीही फार्म हाऊसवर दाखल झाले. जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली. गयाबाई यांच्या फिर्यादीवरून दैठणा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


संशय कामगारांवर
कंत्राटदार फड यांच्या फार्म हाऊसवर काम करणार्‍या कामगारांचा यामध्ये हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून मध्य प्रदेशातील कुकशी तालुक्यातील (जिल्हा धार) बाग गावचे ते दरोडेखोर असल्याची माहिती मिळाली आहे. कामगारही मध्य प्रदेशातील असल्याने त्यांचा या दरोडेखोरांशी संबंध असू शकतो.


सिनेस्टाइल अटक
दरोड्यातील काही संशयित परभणी-औरंगाबाद बसमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिंतूरपासून 25 कि.मी. अंतरावर असलेल्या गणेशपूर पाटीजवळ बस अडवून तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. फरारी आरोपीकडे दरोड्यातील ऐवज व रोख रक्कम असल्याचेही ते म्हणाले.