आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची शक्कल, मजूरांच्या वेशात टोळी केली जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/पाचोड- पाचोडशिवारात दरोडे आणि जबरी चोरी करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोड पोलिसांनी शेतमजूर बनून जेरबंद केले आहे. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रात्री त्यांना कुतुबखेडा (नांदर) येथून टेम्पोमधून जाताना पकडले असून आरोपींनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून जबरीने लुटणाऱ्या तसेच शेतवस्तीवर दरोडे टाकणाऱ्या टोळीच्या शोधात दरोडा प्रतिबंधक पथक अनेक दिवसांपासून होते.
पोलिस उपनिरीक्षक दीपक सरोदे यांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षी परिसरात काही दरोडेखोर फिरत असल्याचे कळले. त्यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह हर्षी परिसर गाठला. मात्र, दरोडेखोर हर्षीऐवजी कुतुबखेडा गावाकडे गेले. त्यानंतर पोलिसांनी कुतुबखेड्याकडे जाण्यापूर्वी वेशांतर करून शेतातील मजूर म्हणून काही वेळ शेतात काम केले. त्यानंतर एका टेम्पोमध्ये बसून जाणा-या चार जणांवर त्यांनी झडप घातली. चौघेही दरोडेखोर असल्याची खात्री पटल्यानंतर सरोदे यांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवून पाचोड पोलिस ठाण्यात आणले.
हाती लागलेले चौघेही अट्टल दरोडेखोर असून त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. शकीन मोमीन चव्हाण (३६ रा. सालवडगाव) हा टोळीचा म्होरक्या असून त्याच्यासह चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. भेद्या ऊर्फ भुऱ्या भोसले (२८), अमोल बाबूराव पवार (२०) आणि शारेश विठ्ठल काळे (३२, रहाटगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे, अतिरक्त पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनात टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे अरुण केंद्रे, पाचोड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे, जमादार प्रभाकर शेळके, रमेश धस, संतोष सोनवणे, शिवानंद बनगे, काशीनाथ लुटे, अशोक थोरात, नीलेश गायकवाड, संदीप धुनावत, कासीम शेख आणि सुनील ढेरे यांनी कारवाईत भाग घेतला.