आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चड्डी-बनियनवर आलेल्या चोरांनी डॉक्टरचे घर फोडले; अडीच लाखांचा मुद्देमाल चोरीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- पहाटे अडीच वाजता चड्डी-बनियन, तोंडाला पांढरे रुमाल बांधून आलेल्या चोरांनी धुमाकूळ घालत बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डॉ.गणेश ढवळे यांचे घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख ५० हजार असा लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना गुरुवारी घडली. गावात आणखी दोन ठिकाणी चोरांना चोरीचा प्रयत्न केला.
 
मांजरसुंबा-पाटोदा मार्गावर लिंबागणेश येथील बसस्थानकाशेजारी डॉ.गणेश ढवळे यांचे हॉस्पिटल आहे. हाॅस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर ते राहतात. बुधवारी घरातील काही लोक बाहेरगावी गेल्याने रात्री एका खोलीत त्यांचे भाऊ अरुण ढवळे झोपले होते, तर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत डॉ. ढवळे झोपले होते. गुरुवारी पहाटे अडीच वाजता आलेल्या चोरांनी जिन्याच्या गेटचे कुलूप तोडून दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केला. त्यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावरील चॅनल गेटचेही चोरांनी कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे गंठण, लॉकेट, कर्णफुले, चांदीच्या वाट्या, पैंजणाचे चार जोड, दोन अंगठ्या, रोख ५० हजार रुपये असा एकूण लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. 

घरात खडबड हाेत असल्याचे पाहून अडीच वाजता ढवळे यांना जाग आली. तेव्हा चड्डी-बनियन तोंडाला पांढरा रुमाल बांधलेले दोन चोर त्यांना दिसले. चोर.. चोर म्हणून ते ओरडले तेव्हा चोर जिन्याच्या पायऱ्या उतरून घराच्या पाठीमागील शेतातातून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. अन्य आठ चोर मात्र शेतात लपून बसले होते. चोरीच्या घटनेनंतर ढवळे यांनी नेकनूर पोलिसांना माहिती दिली. तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी पहाटे ३.१५ वाजता भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस उपअधीक्षक मंदार नाईक यांनीही भेट देऊन पोलिसांना तपासाचे आदेश दिले. 

दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न 
लिंबागणेशयेथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी साहेबराव निर्मळ यांच्या घराचे गेट तोडून चोरांनी पहाटे दोन वाजता प्रवेश केला. काही सापडत नसल्याने चोरांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यानंतर पोखरी रोडवर लक्ष्मण बांगर यांच्या घराच्या गेटचे खोलीचे कुलूप तोडून चोरांनी चोरीचा प्रयत्न केला. 
बातम्या आणखी आहेत...