आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाक दाखवून वैजापुरात दरोडा; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- शहरातील स्टेशन रोडवरील कापड व्यापारी विनोद लालचंद छाजेड यांच्या निवासस्थानी रविवारी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये किमतीचे साडेबारा तोळे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना घडली.

छाजेड यांच्या नवीन घराचे काम सुरू असून दीड वर्षांपासून ते शाखा अभियंता संजय पाटणे यांच्या मालकीच्या र्मचंट्स बँक कॉलनीतील घरात पत्नी व दोन मुलांसह भाडेतत्त्वावर राहत होते. रविवारी पहाटे किचनजवळील दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने दरोडेखोर नेत असताना त्याची चाहूल लागल्यानंतर विनोद छाजेड आपल्या खोलीतून बाहेर आले. या वेळी दरोडेखोरांनी दागिने द्या, अन्यथा सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या छाजेड कुटुंबीयांनी दरोडेखोरांना प्रतिकार केला नाही.

20 ते 25 वयोगटातील दरोडेखोर: र्मचंट्स वसाहतीत छाजेड यांच्या घरात दरोडा टाकणारे सर्वजण 20 ते 25 वयोगटातील होते. हाफ पँट, टी-शर्ट असा त्यांचा पेहराव होता. त्यांच्या हातात कोयते, चाकू अशी हत्यारे होती.

पोलिस घटनास्थळी दाखल:
दरोडा पडल्यानंतर छाजेड यांनी वैजापूर पोलिसांना झालेला प्रकार कळवला. त्यानंतर पोलिस निरीक्षक आनंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जयराम तावडे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला व दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही.

नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण:
मर्चंट्स कॉलनीत रविवारी पहाटे दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्यामुळे परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. या वसाहतीत नोकरदार तसेच व्यापारी वर्गाची निवासस्थाने आहेत. पोलिसांनी परिसरातील रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.