आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल भरण्याच्या बहाण्याने जळकोटमध्ये दिवसा दरोडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नळदुर्ग - डिझेल भरण्याच्या बहाण्याने पेट्रोलपंपावर दाखल झालेल्या दोन बोलेरो वाहनामध्ये १५ ते १७ जणांनी अचानक पंपावरील केबीनमध्ये घुसून व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना मारहाण करून १ लाख ४३ हजार रुपयांचा दरोडा टाकून पलायन केले. हा खळबळजनक प्रकार गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे राष्ट्रीय महामार्गावर घडला असून यावेळी मदतीला धावलेल्या ग्रामस्थांनी एका बोलेरो जीपसह दोघांना पकडून मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

गुरुवारी दुपारी जळकोट येथील झिंगाडे पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक अमर सूर्यवंशी व कर्मचारी महेश लष्करे हे कामकाज करत हाेते. यावेळी तेथे बोलेरो (के.ए.२८ एम.७८०३) व अन्य एक चारचाकी पंपामध्ये दाखल झाली. या वाहनामधून जवळपास १५ ते १७ जण उतरले. यावेळी कर्मचाऱ्यांना ते डिझेल भरण्यास आले असतील असे वाटत असताना ८ ते १० जणांनी केबीनमध्ये घूसून व्यवस्थापक सूर्यवंशी यांना व इतरांनी बाहेर असलेल्या लष्करे यांना लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण करण्यास प्रारंभ केला. या वेळी एकाने सूर्यवंशी यांच्या पोटाला चाकू लाऊन ड्रावरची चावी मागितली. परंतु, सूर्यवंशी यांनी चावी न दिल्याने त्यांनी ड्रावर उचकटून आतमधील १ लाख ४३ हजारांची रोकड लुटली. दरम्यान, पंपावरील आरडाओरड एेकूण परिसरातील नागरीक जमा झाले. त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. नागरिक येत असल्याचे पाहून एका बोलेरोमधून कांहीजण पैशासह पसार झाले. दुसऱ्या वाहनामध्ये दोघे बसले होते तर इतर रस्ता मिळेल तिकडे पसार झाले. मात्र, ग्रामस्थांनी एक बोलेराे व त्यामधील दोघांना पकडून बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

ग्रामस्थ आल्याने दोघे गजाआड
पेट्रोलपंपावरील आरडाओरड ऐकूण परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. परंतु, त्यांना प्रथम हे भांडणच आहे असे वाटले. परंतु, नंतर खरा प्रकार लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत जवळपास १० ते १२ जण एका वाहनामधून उमरगा शहराच्या दिशेने फरार झाले. परंतु, दुसऱ्या गाडीच्या आडवे ग्रामस्थ गेल्याचे पाहून कांही जण बाजूच्या शेतातून फरार झाले. या वेळी ग्रामस्थांनी वाहन पकडून आतमधील दोघांना चोप दिला. पोलिसांनाही बोलावून घेण्यात येऊन त्यांना दोघांसह वाहनाचा ताबा दिला. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधीक्षक पंकज देशमुख , नळदुर्गचे सहायक पोलिस निरीक्षक पांचाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बातम्या आणखी आहेत...