पैठण/बिडकीन - डोळ्यात मिरची पूड टाकून आणि तलवारीच्या धाकावर दोन चोरटे "हम पेट के लिए करते हैं... ' असे म्हणत अर्धा तास धुडगूस घालून कपाटातील दागिने, दोन मोबाइल असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले. तालुक्यातील ढाकेफळ येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिस सूत्रानुसार, पिजेता इंडिया लि. कंपनीत सुरक्षा रक्षक असलेले ढाकेफळ येथील संजय सुखदेव शिसोदे (४३) हे पत्नी सुनीता, मुलगा तुशांत यांच्यासमवेत झोपलेले होते. दरम्यान, रात्री अडीचच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. संजय शिसोदे यांना झोपेतून उठवले आणि "हम पेट के लिए करते हैं... ' असे म्हणत त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. मिरची पावडर डोळ्यात गेल्याने ते जोरात ओरडत होते. चोरट्यांनी "तुझे कुछ नही करेंगे' म्हणत, पाणी आणून देत डोळे धुण्यास सांगितले. परंतु संजय यांच्या ओरडण्याच्या अावाजामुळे त्यांची पत्नी व मुलगा झोपेतून जागे झाले. या वेळी संजय यांच्या पत्नी सुनीता यांना "तेरे पति को कुछ नही करेंगे,' असे म्हणत तलवारीच्या धाकावर संजय यांच्याकडून कपाट उघडून घेतले. कपाटातील दागिने व दोन मोबाइल असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज काढून घेतला. यानंतर संजय यांना "अब सो जा' म्हणत घराचे दार बाहेरून बंद करून चोरटे पसार झाले. दोन्ही चोरटे हिंदी, मराठीत बोलत होते. ते २२ ते २५ वयातील असल्याचे संजय शिसोदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
शिसोदे यांना डोळे धुण्यासाठी दिले पाणी : एकाने धाक दाखवत तलवार समोर धरली, तर दुसऱ्याने मिरची पावडर डोळ्यात फेकली. त्यामुळे मी ओरडत असताना एकाने डोळे धुण्यासाठी पाणी आणून दिले.
तलवारीच्या धाकावर अर्धा तास धुडगूस
संजय शिसोदे यांच्या घरी धुडगूस घालणारे चोरटे २२ ते २५ वयाेगटातील होते. त्यांच्या हातात तलवार होती. तलवारीचा धाक दाखवत आणि "चिल्लाना मत' म्हणत चोरट्यांनी अर्धा तास घरात धुडगूस घातला. दरम्यान, चार वेळा "हम पेट के लिए करते हैं... ' असे ते म्हणाले.
कपाटातून चोरट्यांनी लुटून नेलेला ऐवज
संजय शिसोदे यांच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी २ तोळे सोन्यांचे गंठण, ३० हजार किमतीचे झुंबर, दोन भारांचे जोडवे, दीड ग्रॅमची नथ, ४ ग्रॅम सोन्याचे मणी आणि दोन मोबाइल असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पैठण एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वानाचा माग येळगंगा नदीपर्यंत
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक बच्चनसिंग व सहायक पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथकास औरंगाबाद येथून पाचारण केले होते. या वेळी श्वानाने येळगंगेपर्यंत माग काढून परत फिरले.