आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणी खुर्द येथे दरोडेखोरांचा हल्ला; तिघे जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिऊर - चड्डी, बनियन परिधान केलेल्या सात दरोडेखोरांनी वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे चार तास हैदोस घातला. यात सहा घरांतील मिळून दोन लाख 65 हजार रुपये किमतीचा ऐवज लुटत तिघांना जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते तीन वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात कमालीची दहशत पसरली आहे.

लोणी खुर्द येथून जवळच असलेल्या चिकटगाव रस्त्यावरील वस्तीवर रात्री साडेबाराच्या सुमारास 21 ते 30 वयोगटातील सात दरोडेखोरांच्या टोळक्याने सोबत असलेल्या धारदार कुर्‍हाड, गुप्ती, काठय़ा व सळई घेऊन भाऊसाहेब कारभारी जाधव यांच्या घरात प्रथम प्रवेश केला व शस्त्रांचा धाक दाखवून चोरी केली. त्यानंतर दरोडेखोरांनी लोणी खुर्द गावातील व नांदगाव रोडलगतच्या गोविंद दत्तू जाधव, राजेंद्र जयराम कदम, बाळू विठ्ठल जाधव, जगन्नाथ भानुदास जाधव, अनिल मच्छिंद्र जाधव यांच्या घरांवर मोर्चा वळवून मोबाइल, दोन दुचाकी, सोन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम लुटली.

या वेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत गोविंद जाधव, राजेंद्र कदम, बाळू जाधव हे तिघे जखमी झाले. दरम्यान, शिऊर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते लोणी येथे पोहोचले. मात्र, दरोडेखोरांना याची कुणकुण लागल्याने जवळच्या चार दुचाकीपैकी दोन दुचाकी (यातील एक विना पासिंगची ड्रीम युगा व दुसरी (एमएच 15 बीएफ 4052) घटनास्थळी सोडून, खरज व चिकटगाव येथून चोरलेल्या दोन दुचाकीवर चौघांनी पोबारा केला, तर दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.

शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दरोडखोरांचा तलवाडा घाटात पाठलाग केला. मात्र ते हाती लागले नाहीत.