आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery News In Marathi, Akola Passenger, Divya Marathi

अकोला पॅसेंजर लुटणा-या दरोडेखोरांच्या मुसक्या अवघ्या सहा तासांत आवळल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - पूर्णा येथून निघालेल्या चालत्या रेल्वेवर बोल्डा-नांदापूर रेल्वेस्थानकादरम्यान 6 ते 7 दरोडेखोरांनी शनिवारी मध्यरात्री दरोडा टाकला. 9 प्रवाशांना गंभीर मारहाण करून 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. कळमनुरी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. चारही आरोपींना नांदेड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

संदेश ऊर्फ शिवा ( रा. शिलेगाव, जि. चंद्गपूर), शेख बाबा शेख चांद (रा. परभणी), शेख गफ्फार शेख कल्लू (रा. परभणी) व मुंजाजी शशिकिरण जलौद (रा. पूर्णा, जि. परभणी) अशी चौघांची नावे आहेत. शनिवारी रात्री 11.30 वाजता पूर्णा स्थानकातून पूर्णा-अकोला पॅसेंजर अकोल्याकडे निघाली. गाडीने बोल्डा स्थानक (ता. कळमनुरी) सोडल्यानंतर काही वेळातच दरोडेखोरांनी रेल्वे इंजिनपासून चौथ्या क्रमांकाच्या डब्यातील प्रवाशांना तलवारी, चाकूने बेदम मारहाण करून दागिने, रोख रक्कम लुटली. चोरट्यांचा हा धुमाकूळ सुमारे 15 मिनिटे सुरू होता. त्यानंतर नांदापूर रेल्वेस्थानकजवळ येताच दरोडेखोरांनी चेन ओढली.
रेल्वेची गती कमी झाल्यावर पोबारा केला. सुरुवातीला नांदापूर स्थानकावर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. रात्री साडेबारा वाजता गाडी हिंगोलीत आल्यानंतर सर्व जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दरोड्याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय शंकर सिटीकर आणि पोलिसांच्या ताफ्याने बोल्डा-नांदापूर भागातील सर्व रस्त्यांची नाकेबंदी केली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिशेने दरोडेखोर पळाले त्या भागाकडे पोलिसांचे पथक रवाना झाले आणि चार दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

अशी झाली कारवाई
दरोडेखोर बोल्डा येथील जंगलाच्या टेकडीच्या दिशेने पळून गेले असल्याची माहिती प्रवाशांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने पहाटे दोन वाजता कारवाईचे चक्रे फिरवली. दरोडेखोर लपून बसल्याचे स्पष्ट झाले. बोल्डा रेल्वेस्थानकावर पहाटे तीन वाजता पूर्णेकडे जाणा-या रेल्वेतून पसार व्हायचे होते, या उद्देशाने ते लपून बसले होते. अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पळून जाण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने पोलिसांनी सर्व परिसराला वेढा घालून दरोडेखोरांचे सर्व मार्ग बंद केले. रविवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने कारवाई सुरू केली आणि चार दरोडेखोर हाती सापडले.

जखमी प्रवाशांची नावे
राहुल राठोड (पूर्णा), सचिन पोहेकर (मंगरूळपीर), कांचन थोरात (नागपूर), विजय शिंदे (खामगाव), प्रदीप राठोड (माजलगाव), अरुण राठोड (मानवत), अहमद पठाण (नांदेड), सुधाकर महाजन (नांदेड) आणि निर्मलाबाई राठोड (माजलगाव).