आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचोड-पैठण मार्गावर 9 लाखांचा दरोडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - जालना येथून पुण्याकडे जाणार्‍या साडेसहा लाखांच्या लोखंडी सळयांसह ट्रक पळवून नेण्याची खळबळजनक घटना पैठण-पाचोड मार्गावर गुरुवारी रात्री घडली. दोन दुचाकींवरून पाठलाग करणार्‍या 6 दरोडेखोरांनी चालक व क्लीनरला बेदम मारहाण करत हा दरोडा टाकला. विशेष म्हणजे रात्री 10 वाजता चौघांनी ट्रक घेऊन पोबारा केल्यावर दोघा दरोडेखोरांनी पहाटे 3 वाजेपर्यंत एका शेतात चालक व क्लीनरला डांबून ठेवले होते.

या प्रकरणी पैठण पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंवि 495 कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भात शुक्रवारी ट्रकचालक लक्ष्मण शिवाजी भगत (22, चिखली, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी जालना येथील धनलक्ष्मी स्टील कंपनीतून 16 टन वजनाच्या लोखंडी सळया घेऊन पुण्याला जाण्यासाठी (एमएच 04 एएल 720) ट्रकने निघालो होतो. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता रवाना झाल्यावर अंबडमार्गे पाचोड व नंतर पैठणकडे निघालो. रात्री 10 वाजता दावरवाडी ते रहाटगावदरम्यान निर्मनुष्य मार्गावर पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी दुचाकी ट्रकपुढे आडव्या लावल्या. त्या दोन्ही दुचाकींवर 6 जण होते. त्यांनी मला खाली ओढून बेदम मारहाण केली. क्लीनरलाही बदडून काढले. त्यानंतर 4 दरोडेखोरांनी लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक घेऊन पाचोडकडे पसार झाले. दुचाकीसह थांबलेल्या दोघा दरोडेखोरांनी आम्हाला मारहाण करत बाजूच्या शेतात ओलीस ठेवले. नंतर पहाटे 3 वाजता दुचाकीवरून त्यांनीही पोबारा केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. चालकाच्या खिशातील रोख 800 रुपये व मोबाइल या दरोडेखोरांनी काढून घेतल्यामुळे त्याचा जालन्यातील मालकांशी संपर्क होऊ शकला नाही. पैठण पोलिसांपर्यंत पोहोचायला दुपार झाली होती. घटनास्थळी पोलिस अधीक्षक संदीप जाधव व पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली.