आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोहयोचे काम पाच टक्के चालू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - जास्तीत जास्त मजुरांना रोजगार पुरवून त्यांचे स्थलांतरण थांबवण्यासह विकास करून घेणे हे रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट आहे. यावर्षी दुष्काळी स्थिती असूनही जिल्ह्यात मात्र आजघडीला केवळ 211 कामे चालू असून केवळ 866 मजुरांनाच काम मिळाले आहे. ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या केवळ 0.28 मजुरांना काम मिळाले असून केवळ 5 टक्केच कामे चालू असल्याने रोहयोची झालेली दुर्दशा स्पष्टपणे दिसून येत आहे.


रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात 4 हजार 38 कामे उपलब्ध करून 3 लाख 285 मजुरांना कामे देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. एवढी कामे उपलब्ध होण्याची जिल्ह्याची क्षमता असून मजूरही उपलब्ध होऊ शकतात, परंतु ग्रामसेवकांचा बहिष्कार, लेखा कर्मचा-या चा बहिष्कार आदी कारणे सांगून जिल्हा प्रशासनाने हमीच्या कामासाठी यावर्षी प्रयत्न केले नाहीत. यामुळे फेबु्रवारी महिन्याच्या मध्यापर्यंतही कामे वाढली नाहीत. परिणामी हिंगोली तालुक्यात 15 कामे चालू असून त्यावर 44 मजूर काम करीत आहेत. कळमनुरी तालुक्यात 41 कामांवर 127, वसमतमध्ये 72 कामांवर 147, औंढा नागनाथमध्ये 22 कामे 60 मजूर करतात. सेनगाव तालुक्यामध्ये 61 कामांवर सर्वात जास्त 488 मजुरांचे काम चालू आहे. प्रशासनाने केलेले कामांचे नियोजन केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात उतरण्यास आणखी किती अवधी लागणार हेही निश्चित नाही. कामांच्या उद्दिष्टांशी तुलना केल्यास चालू असलेल्या कामांचे प्रमाण केवळ 5 टक्के आहे. चालू असलेल्या कामांमधून उद्दिष्टांच्या केवळ 0.28 टक्के मजुरांनाच काम मिळत आहे. सेनगाव पंचायत समितीने 10 दिवसांपूर्वीच जास्तीत जास्त रोहयोची कामे सुरू करण्याचा ठराव घेऊनही जिल्हा प्रशासनाने अद्याप या तालुक्यात नवीन कामांना सुरुवात केली नाही. सद्य:स्थितीत कामे करीत असलेल्या मजूर संख्येवरून या तालुक्यात मजूर मिळण्याची क्षमता दिसून येते. मजुरांना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च भागवण्याचा मूळ उद्देश असला तरी मजुरांना 2-2 महिने मजुरीसाठी वाट पाहावी लागत असल्याने कधी बेमुदत उपोषण तर कधी हिंसक आंदोलन करण्याचा मार्ग मजुरांना अवलंबवावा लागला. प्रशासकीय यंत्रणा नियमित कामे करण्यात कुचराई करीत असल्याचेच यातून दिसून येते.

मार्चपूर्वी जास्तीत जास्त कामे
‘मागणी आल्यानंतर कामे ताबडतोब सुरू करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिका-या ना देण्यात आल्या आहेत. सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये काही दिवसांमध्येच 300 च्या वर कामे सुरू होणार आहेत, तर जिल्ह्यात मार्चपूर्वीच कामांना सुरुवात करून कामांची संख्या 2 हजारांच्या जवळपास नेऊन घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.’
रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी, रोहयो.