आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: वंचितांच्या शिक्षणासाठी धावला क्रिकेटचा देव!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बालवयातच नियतीने केेलेल्या आघातामुळे शिक्षणापासून दुरावलेल्या, वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्यात आनंदाचा 'दीप' पेटवणाऱ्या शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतीवन प्रकल्पातील मुलांच्या शिक्षणासाठी आता क्रिकेटचा देव धावून आला आहे. शांतीवनातील शाळेच्या इमारत बांधकामासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकरने खासदार निधीतून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

नियती आणि परिस्थितीने कधी जगण्याचा तर शिक्षणाचा हक्कच हिरावण्याचा प्रयत्न केेलेल्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाची गंगा आणणारा शिरूर तालुक्यातील आर्वी शांतीवन प्रकल्प अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. अनुदानाशिवाय केवळ समाजाच्या पाठबळ व मदतीवर १६ वर्षांपासून शांतीवनाची वाटचाल सुरू आहे. दीपक आणि कावेरी नागरगोजे हे दांपत्य या मुलांसाठी सेवावृत्तीने काम करत आहेत. शांतीवनाच्या वाटचालीत देश-विदेशातून अनेक जण जोडले जात आहेत. आज परिसरातील हजारो मुले येथे शिक्षण घेतात. यंदापासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलेही शांतीवनात दाखल होतील. सचिन तेंडुलकर याने दुष्काळी जिल्ह्यातील शांतीवनातील मुलांना शिक्षण सुविधा मिळण्यासाठी सरस्वती साधना विद्यामंदिराच्या इमारतीसाठी ३० लाख व संरक्षक भिंतीसाठी १० लाख निधी मंजूर केला आहे. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले आणि डॉ. मंदार परांजपे यांनी शांतीवनचे कार्य सचिनपर्यंत पोहाेचवले होते.

सेलिब्रिटींना दुष्काळाची काळजी
बीडच्या दुष्काळाची माहिती महिनाभरापूर्वीच सचिनने स्वीय सहायकांना पाठवून घेतली होती. अंबाजोगाईत रस्त्यांसाठीही सचिनचा निधी वापरण्यात आला होता. गतवर्षी सलमान खानने टाक्या पाठवल्या होत्या. अक्षयकुमारनेही शेतकऱ्यांना ५५ लाखांची मदत केली आहे.

सुसज्ज शाळेसाठी निधी
लोक कामाशी जोडले जात आहेत. मुलांची संख्या वाढत आहे. सुसज्ज शाळेसाठी सचिन तेंडुलकर यांचा निधी कामी येणार असून शांतीवनसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का आहे.
- दीपक नागरगोजे, शांतीवन, आर्वी