आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना झापले, तूर खरेदीत गोंधळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर दौऱ्यावर आलेल्या कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भेटून शेतकऱ्यांनी तूर खरेदीतल्या समस्यांचा पाढा वाचल्यानंतर खोतांनी थेट तूर खरेदी केंद्र गाठून अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. त्याचबरोबर हमालांकडून होत असलेली चोरीही या वेळी उघडी पाडून त्याची चौकशी करण्याचे आदेश खोत यांनी दिले.  
 
एका लग्नाच्या निमित्ताने सदाभाऊ खोत बुधवारी लातूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेतल्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यांना भेटून तूर खरेदीच्या व्यथा मांडल्या. त्या ऐकून खोतांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट कव्हा नाक्यावरील तूर खरेदी केंद्र गाठले. तेथे सहकार, पणन, बाजार समिती, नाफेड, महसूल आणि विदर्भ फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. शेतकऱ्यांच्या तुरीचे वजन होताना सगळ्याच विभागांचा एक अधिकारी उपस्थित राहावा, १२ ऐवजी २० वजनकाटे सुरू करावेत, अशा सूचना सदाभाऊंनी दिल्या. तेवढ्यात एका शेतकऱ्याने चाळणी केल्यानंतर खाली उरलेले मातेरे (सारवा) हमाल शेतकऱ्यांना परत देत नाहीत, अशी तक्रार केली. एक हमाल दररोज किमान अशी गोळा केलेली ५० किलोपेक्षा जास्त तूर घरी नेतो, असे सांगितले. एका कोपऱ्यात असे गाठोडे बांधून ठेवल्याचे सांगितल्यानंतर सदाभाऊंनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तो कोपरा गाठला. तेथे २० ते २५ गाठोड्यांमध्ये तुरीचे मातेरे बांधून ठेवल्याचे आढळले. जिल्हा उपनिबंधकांनी ते ताब्यात घेऊन ते कुणी गोळा केले याची चौकशी करावी, असे आदेश दिले.  
 
अधिकारी मंत्र्यांनाही जुमानेनात...  
तूर खरेदी केंद्रावर पणन खात्याचे अधिकारी फिरकलेच नाहीत आणि ते शेतकऱ्यांच्या तक्रारीही ऐकून घेत नाहीत, अशा तक्रारी आल्यानंतर सदाभाऊंनी शुभांगी गोंड या अधिकाऱ्याकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांनी तूर खरेदीच्या जीआरमध्ये पणन खात्याचा उल्लेख नाही म्हणून आपण आलो नसल्याचे सांगितले. मात्र, मी वरिष्ठांना विचारून घेते, असे उत्तर महिला अधिकाऱ्यांनी दिले. अवाक् झालेल्या सदाभाऊंनी आपण मंत्री असल्यामुळे वरिष्ठच आहोत, याची जाणीव त्यांना करून दिली. वखार महामंडळाचे अधिकारी तूर परत पाठवत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या तक्रारीवर सदाभाऊंनी वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस. एम. घन यांना तेथे एक कर्मचारी नेमण्याची सूचना केली.  
बातम्या आणखी आहेत...