आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभाजीराव... निलंग्याच्या बाहेर कधी पडणार, भाजपत होतेय चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जिल्ह्यातल्या संभाजी पाटील निलंगेकर यांचा मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून प्रवेश झाल्याला आता महिना होत आला. त्यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या लातूरमध्ये भाजप रुजवणे आणि वाढवणे हा पक्षश्रेष्ठींचा हेतू आहे. मात्र, स्वत:ला निलंगा मतदारसंघापुरतेच सीमित करून घेण्याचा संभाजीरावांचा स्वभाव आहे. फक्त निलंगा या मानसिकतेतून बाहेर आल्याशिवाय संभाजी पाटील जिल्ह्याचे नेतृत्व करू शकणार नाहीत. त्यामुळे ते निलंग्याच्या बाहेर कधी पडणार? असा प्रश्न भाजपचेच कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख, अलीकडच्या काळात अमित देशमुख यांच्यामुळे काँग्रेसचा जिल्हा अशी लातूरची ओळख अजूनही अबाधित आहे.

कोणत्याच निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेला अपवाद वगळता घवघवीत यश मिळालेले नाही. मात्र, काँग्रेसची सत्ता असली तरी विरोधी आवाज कायम ठेवण्यातही या जिल्ह्याला यश आले आहे. बड्या नेत्यांच्या सत्ता राबवण्याच्या कौशल्याखाली आत्मविश्वास गमावलेल्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर विरोधकांना कधीच नेता मिळाला नाही. आपल्याच घराण्याच्या विरोधात जाऊन एकदा खासदारकी आणि दोनदा आमदारकी मिळवण्याच्या प्रयत्नाला यश आले ते संभाजी पाटील निलंगेकरांना. मात्र, जिल्ह्याचा नेता अशी ओळख अजूनही त्यांना निर्माण करता आलेली नाही. पक्षपातळीवर त्यांना काही अडचणी असतीलही; पण मंत्री झाल्यावर प्रशासनाचा वापर करून किमान जिल्ह्यातील अडलेली कामे मार्गी लावणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी सत्तारोहणाच्या वर्षपूर्तीनिमित्त पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली जाणीवपूर्वक पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारने लातूर जिल्ह्यासाठी केलेल्या कामांची यादी जाहीर करण्याची जबाबदारी दिली होती. त्या वेळी त्यांनी लातूरला उजनीहून पाणी देण्याची योजना मंजूर केल्याचा दावा केला होता. मधल्या काळात लातूरचा पाणीप्रश्न एवढा गंभीर झाला की रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. त्याही काळात संभाजी पाटील अदृश्य राहिले.

जिल्ह्याचा नेता अशी प्रतिमा नाही
संभाजी निलंगेकरांवर प्रदेशपातळीवरील नेत्यांची मर्जी आहे. लातूर जिल्ह्यात भाजपला चेहरा नाही आणि नेताही नाही. गटातटात विखुरलेल्या भाजपला एकत्र करून पक्षाला नेतृत्व देण्याची जबाबादारी संभाजी निलंगेकरांवर आहे. त्यासाठी प्रदेश पातळीवरून त्यांना वारंवार संधीही देण्यात आली. मात्र, आजवरचा इतिहास पाहिला तर अशा अनेक संधी निलंगेकरांनी गमावल्या आहेत. लातूरमध्ये निवासस्थान असतानाही त्यांचा मुक्काम निलंग्यातच असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या इतर भागांतील कार्यकर्त्यांना त्यांना भेटणे सोयीचे राहत नाही.

भाजयुमोचे होते प्रदेशाध्यक्ष
संभाजी पाटील निलंगेकर मागच्या काळात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष होते. आमदार राहिलेल्या संभाजींना खरेतर हे पद म्हणजे राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे विणण्याची मोठी संधी होती. मात्र, त्यांनी राज्य किंवा मराठवाडा सोडाच लातूर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांतही चार माणसे जोडता आली नाहीत. सदासर्वकाळ निलंगा आणि निलंगा इतकाच जप करण्याच्या स्वभावामुळे त्यांनी ही संधी गमावली. मधल्या काळात त्यांची पक्षात गोची झाली; परंतु नितीन गडकरींच्या माध्यमातून पक्षात त्यांनी पुन्हा स्थान निर्माण केले. आता तर ते मंत्री झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...