आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्‍हाडी मंडळींना राजकारणाचे डोस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - कळमनुरी येथे सोमवारी आमदार राजीव सातव यांनी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्याऐवजी बोलावण्यात आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून सातव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मुळातच आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या विवाह सोहळ्यात वर्‍हाडी मंडळींना जबरदस्तीने राजकारणाचे डोस पाजण्यात आल्याने विवाह सोहळ्याला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले होते.

कळमनुरीचे आमदार राजीव सातव यांच्या प्रियदर्शिनी सेवा संस्थेच्या वतीने कळमनुरीत सामुदायिक विवाह सोहळ्यास जम्मू-काश्मीरचे मंत्री वकार रसूल वाणी, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, पालकमंत्री वर्षा गायकवाड, मुंबईतील खासदार एकनाथ गायकवाड, काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह, आमदार विजय खडसे यांना आमंत्रित करण्यात आले होते. साडेअकरा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत 13 बौद्ध, 1 मुस्लिम व 7 विवाह हिंदू पद्धतीने लावण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या सुमारे दीड तासाच्या भाषणबाजीत वधू-वरांना आशीर्वाद देण्याऐवजी प्रत्येक नेत्याने राजीव सातव यांच्या कार्याचा आढावा घेतला. मंत्री वकार रसूल यांनी सातव हे राज्य नाही तर राष्ट्रीय पातळीवर राजकारण करण्यास योग्य असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे त्यांना लोकसभेवर पाठवण्याचे आवाहन वर्‍हाडी मंडळींना केले. कृपाशंकर सिंह यांनी सातव यांचे मतदारसंघाकडे विशेष लक्ष असल्याचे सांगून ते मातब्बर नेते असल्याची पुस्ती जोडली. पालकमंत्री गायकवाड व खासदार गायकवाड यांनी त्याहीपुढे जाऊन मराठवाड्यातील दुष्काळात सामुदायिक विवाहाद्वारे सातव यांनी नवा आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार काढले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा मोका साधण्यासाठी राजकीय नेते मंडळींकडून या फॉर्म्युल्याचा वापर होताना दिसत आहे.