आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर शेतकर्‍यांवर फौजदारी गुन्हे नोंदवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाकळी/अंबड - अनेक तस्कर गोदापात्रात अवैध वाळू उपसा करत आहेत. शेतातून रस्ते तयार करत त्यांना काही शेतकरी साथ देत आहेत. हा प्रकार निदर्शनास येताच पैठणचे तहसीलदार संजय पवार यांनी अशा शेतकर्‍यांवर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची तंबी देत प्रसंगी संबंधित शेतकर्‍यांच्या सातबारावर बोजा टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. वाळू माफियांकडून वापरल्या जाणार्‍या पर्यायी रस्त्यांवर बुलडोझर फिरवल्यानंतर त्यांनी हा इशारा दिला.

मागील महिन्यात वाळू तस्करांवर कारवाई करत तहसीलदारांनी दीड कोटी रुपयांचा महसूल वसूल केला होता. यानंतरही तालुक्यात ठिकठिकाणी कारवाईचे सत्र राबवत अवैध वाळू साठ्यासह ट्रक्टर, हायवा ट्रक जप्त केले होते. या धडक कारवाईमुळे अवैध उपशाला चाप लागला होता. मात्र, यानंतर वाळू माफियांनी स्थानिक अधिकारी कर्मचार्‍यांना हाताशी धरत अंतर्गत रस्त्यांवरून वाळू उपसा सुरू केला. काही शेतकरी आपल्या शेतातून वाळूची वाहने नेण्याची परवानगी देत पैसे उकळत असल्याची बाबही तहसीलदार पवार यांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे त्यांनी अचानक भेटी देण्यास सुरुवात केली. अंतर्गत भागातील रस्ते आणि गोदाकाठी अवैध वाळूचे साठे आढळताच या साठ्यांची विल्हेवाटही लावली.

ते रस्ते खोदले
मंगळवारीतहसीलदार संजय पवार, पाचोड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्यासह हिरडपुरी, उच्च पातळी बंधारा, टाकळीअंबड, आवडेउंचेगाव आदी भागातील अवैध वाळू साठे नष्ट केले. तसेच वाळू माफियांकडून वापरला जाणार्‍या शेतातील रस्त्यांवर जेसीबीने खड्डे खोदण्यात आले.

(फोटो : अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या उपस्थितीत जेसीबीने रस्ते खोदले. छाया : ईश्वर वाकडे)