आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नायब तहसीलदारासह दोन कर्मचार्‍यांना नोटिसा बजावल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून सर्रास अवैध वाळूची वाहतूक करणारी वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महसूल प्रशासनातील अधिकारी आर्थिक हातमिळवणी करून वाहने बिनबोभाट सोडत आहेत. यासंदर्भात दैनिक "दिव्य मराठी'त वृत्त प्रसिद्ध होताच तहसीलदार अभय बेलसरे यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली. त्यानंतर कारवाईच्या नावाखाली आर्थिक वसुली करणार्‍या महिला नायब तहसीलदारासह दोन कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. गंगथडी भागातील गोदावरी नदीपात्रातून काही दिवसांपासून वाहनाद्वारे बेसुमार वाळूचा अवैध उपसा सुरू आहे, परंतु वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याऐवजी महसूल विभागाचेच अधिकारी माफियांना खुलेआमपणे साथ देत असल्याने माफिया बेफाम सुटले आहेत.

लाडगाव व पुरणगाव रस्त्यावर निवासी नायब तहसीलदार चैताली दराडे व अन्य दोन कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी न घेता एक खासगी वाहन घेऊन वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणारी वाहने पकडली होती. वाहनांवर पथकाने कोणतीही कारवाई न करता ती सोडून देण्यात आली.

यासंदर्भात "दिव्य मराठी'मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी शासनाचा महसूल वाढवण्याऐवजी स्वतःचा आर्थिक "महसूल' वाढवण्यावर भर देत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तहसीलदार बेलसरे यांनी नोटिसा बजावण्याची कारवाई केली आहे.

२४ तासांत खुलासा सादर करा : बेलसरे
बेकायदा वाळू उपसा व वाहतूक प्रतिबंध घालण्याऐवजी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी आर्थिक तोडपाणी करून वाळू चोरीला खुलेआम पाठबळ देत आहेत. असे उघडकीस आल्यामुळे नायब तहसीलदार चैताली दराडे व दोन कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वाळूची बेकायदा वाहतूक करणारी वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई न करता बिनबोभाटपणे का सोडून दिली, तहसील कार्यालयाचे शासकीय वाहन उपलब्ध असताना खासगी वाहन कारवाई करण्याच्या नावाखाली वापरले. त्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना न कळवता गैरकृत्य केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपणाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ नुसार विभागीय चौकशी का प्रस्तावित का करू नये, याबाबत २४ तासांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.