आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुदान उचलूनही शौचालय न बांधणाऱ्यांवर फौजदारी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शहरातील ८५० जणांनी अनुदान घेऊनही शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले नाही. त्यामुळे बांधकाम करायचे नसेल तर अनुदान परत करा, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा लातूर महानगरपालिकेने लाभार्थींना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या वतीने हागणदारीमुक्तीसाठी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थीला शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. महापालिकेने सरकारच्या रकमेत भर घालून त्यात आणखी तीन हजार रुपये वाढीव दिले आहेत. त्यामुळे एकूण १५ हजारांचे अनुदान शौचालय बांधकामासाठी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत महापालिकेला तीन कोटी १७ लाखांचा अनुदानाचा पहिला टप्पा मिळाल्यानंतर महापालिकेने अर्ज मागवून सुरुवातीला तीन हजार ५६८ व त्यानंतर ७५६ लाभार्थींची निवड केली आहे.

सर्व लाभार्थींना बांधकाम करण्यासाठी सहा हजारांचा पहिला हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात आला. मात्र, उन्हाळ्यात लातूर शहरात भीषण पाणीटंचाई असल्यामुळे बांधकाम होऊ शकले नव्हते. केवळ १६०० लोकांनी बांधकाम पूर्ण केले होते. म्हणून त्यांना ६ हजार रुपयांचा दुसरा हप्ताही देण्यात आला होता. परंतु काही जणांनी अनुदान घेऊनही बांधकाम पूर्ण केले नसल्याने महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने निवड झालेल्या लाभार्थींच्या घरोघरी जाऊन अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यास सांगितले जात आहे.

बांधकाम पूर्ण करण्याचे आवाहन
यंदाच्या उन्हाळ्यात लातूर शहरला भयंकर पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामांवर बंदी घातली होती; परंतु पाऊसकाळ जोरात झाल्याने सर्वत्र पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे अनुदान घेतलेल्या लाभार्थींनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यातीलही अनुदान प्राप्त
शासनाकडून सदर योजनेच्या दुसरा टप्प्यातील अनुदानही आठ दिवसांपूर्वी मंजूर झाले असून, त्यापोटी दोन कोटी ४० लाख रुपये महापालिकेकडे वर्ग झाले आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या अनुदानातून पहिल्या टप्प्यातील हप्ते व पहिल्या टप्प्यात महापालिकेकडे दाखल झालेल्या शौचालय मागणीच्या अर्जांची पाहणी करून लाभार्थींची निवड केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...