आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'संत एकनाथ' बंद; शेतकऱ्यांचा ऊस चालला इतर कारखान्यांनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठणच्या शेतकऱ्यांच्या हक्काचा संत एकनाथ कारखाना यंदा बंद राहिल्याने तालुक्यातील साडेचार हजार हेक्टरवरील ऊस पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना घालावा लागत आहे. त्याला योग्य भाव मिळावा यासाठी पैठणमध्ये प्रथमच आंदोलन होत असून चौथ्या दिवशी रॅली काढत शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणची तोड बंद करत आंदोलन तीव्र केले.
जायकवाडी धरणाच्या मुबलक पाण्यावर तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात येथील संत एकनाथ कारखाना काही स्थानिक नेत्यांच्या राजकीय वर्चस्वापायी बंद राहिला असल्याने पैठणमधील सर्व ऊस घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सहा ते सात कारखान्यांनी या भागात चारशे उसाच्या टोळ्या टाकल्या आहेत. हा ऊस ते घेऊन जात असताना या उसाला काय भाव देणार हे सांगितले नसल्याने तालुक्यातील शेतकरी कोणत्या कारखान्याला ऊस द्यावा या चिंतेत होता. मात्र तालुक्यातील कारखाना बंद असल्याने येथील शेतकऱ्यांना हा ऊस बाहेरील कारखान्याला घालण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने भाव तरी योग्य मिळावा यासाठी येथील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : चार दिवसांपासून आंदोलन सुरू असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. यात पोलिस बंदोबस्तामुळे आंदोलन शांतपणे सुरू आहे. तहसील प्रशासनाने या आंदोलनाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील गाळपावर परिणाम : या आंदोलनाची दखल घेत काही कारखान्यांनी भाव जाहीर केले. त्या कारखान्यांच्या गाड्या सोडण्यात आल्या. मात्र अद्यापही नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी भाव जाहीर केले नसल्याने त्यात पैठणमधील ऊस या कारखान्यांना जास्त प्रमाणात जातो. त्या कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर परिणाम झाला असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
काटा मारण्याचा धोका : पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांचे व पैठणच्या उसाच्या क्षेत्राचे अंतर पाहता कारखाने भाव जाहीर करतील, मात्र त्यात काटा मारणार नाहीत कशावरून, असा प्रश्न शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला.
चार दिवसांत एकही पुढारी आंदोलकांना भेटला नाही
आंदोलन तीव्र करणार
आंदोलनाचे नेतृत्व करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पखडकर,अमरसिंह कदम आदींनी शासन व प्रशासन आमच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
^पैठणमधील लोकप्रतिनिधी फक्त मते मागण्यासाठी शेतकऱ्यांकडे येतात. आता आम्ही आंदोलन करत असताना चार दिवसांत एकही पुढारी येथे आला नाही. आमच्या हक्काचा संत एकनाथ कारखाना बंद पाडला नसता तर आम्हाला या कडाक्याच्या थंडीत आंदोलन करण्याची वेळ आली नसती.
- किशोर दसपुते, शेतकरी, पैठण
^काटा मारण्याचे प्रकार होत आहेत ते आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. त्यावर कारवाई करावी. आता आम्ही आंदोलन भाववाढीसाठी करत आहोत. त्यानंतर हे प्रकार वाढतील अशी शक्यता आहे.

- जयाजी सूर्यवंशी, शेतकरी नेते, पैठण
^संत एकनाथ कारखाना काही राजकीय लोकांच्या राजकीय वर्चस्वाच्या खोट्या अहंपणामुळे बंद राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली.
- तुषार शिसोदे, चेअरमन, संत एकनाथ कारखाना
बातम्या आणखी आहेत...