आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Eknath Temple Paithan Program On Mahashivratra

आठकाठी: षष्ठीला दहीहंडी मंदिराबाहेर फोडण्यासाठी रेटा वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या वंशवादाचा मुद्दा सध्या काहीसा मिटल्याचे दिसत असले तरी, आता काल्याची दहीहंडी मंदिराऐवजी खुल्या जागेत गोदाकाठी फोडावी अशी मागणी वारकऱ्यांमधून पुढे येत आहे. काल्याची दहीहंडी मंिदरात फोडल्यास केवळ ठरावीक मंदिर परिसरातील भाविकांनाच प्रसादाचा लाभ होतो. ही दहीहंडी गोदाकाठच्या कृष्णकमल तीर्थावर फोडली गेली तर दूरवरून आलेल्या वारकऱ्यांना याचा लाभ होईल, असे मत अखिल भारतीय वारकरी शिखर परिषदेचे ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी मांडले आहे. वारकऱ्यांच्या या मागणीमुळे आता काल्याची दहीहंडी फोडण्याचा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पैठण येथील संत एकनाथांच्या नाथषष्ठी यात्रेला २९ मार्चपासून सुरुवात होत आहे. यात्रेत राज्यभरातून सुमारे पाच ते सात लाख भाविक येतात. वारकरी यांचा येथे तीन दिवस मुक्काम असतो. काल्याचा प्रसाद घेऊन वारकरी आपल्या गावी परतता. बाहेरून येणार वारकरी ज्या काल्याच्या दहीहंडीच्या प्रसादासाठी येथे थांबतात त्या वारकऱ्यांना काल्याचा प्रसाद मिळत नाही, तर मंदिरात प्रवेशही मिळत नाही. ज्यांना मंदिरात प्रवेश दिला जातो त्यांच्या हातीच काल्याचा प्रसाद येतो. जर ही दहीहंडी मंदिरात न फोडता मंदिरा मागील गोदाकाठावरील कृष्णकमल तीर्थावर फोडली गेली तर राज्यभरातील वारकऱ्यांना या काल्याच्या दहीहंडीचा प्रसाद व दर्शन सोहळा थेट पाहता येईल. यासाठी मंदिरात काल्याची दहीहंडी न फोडता ती बाहेर फोडली जावी अशी मागणी अखिल भारतीय वारकरी शिखर परिषदेचे ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, प्रा संतोष गव्हणे, दिनेश पारिख आदींनी केली आहे. या मागणीला नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी ही परंपरा आहे त्याला तडा जाता कामा नाही असे म्हटल्याने नाथ षष्ठीत येणाऱ्या लाखो भाविक वारकरी यांना काल्याच्या दहीहंडीचा प्रसाद मिळणे यंदाही कठीणच बनले असून हा सोहळा त्यांना मंदिराबाहेरील स्क्रीनवरच अनुभवावा लागेल असे दिसून येते.

५०० वर्षाची परंपरा:
संत एकनाथ महाराज यांनीच फाल्गुन षष्ठीला काल्याच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर ही परपंरा सुरू झाली, आता या परंपरेला ४१७ वर्षे होत आहेत. मात्र, दर वर्षी वारकरी भाविकाची संख्या वाढत गेल्याने नाथ समाधी मंदिरातील काल्याच्या दहीहंडीचा लाभ मंदिरातील अपुरी जागा पाहता भाविकांना घेता येत नाही.

नाथ वंशजांच्या वेगवेगळ्या भूमिका:
नाथ समाधी मंदिरातील काल्याच्या दहीहंडीविषयी नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी व योगिराज महाराज गोसावी यांना विचारले असता यांच्यात या मुद्यावर वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळाल्या. नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी म्हणाले की, सध्या इलेक्ट्रॉनिक युग असून भाविकांना काल्याच्या दहीहंडीचा कार्यक्रम स्क्रीनवरही पाहता येतो, हाच कार्यक्रम मंदिराबाहेर ठेवला तर आमची परंपरा नष्ट होईल, आणखी स्क्रीन त्यासाठी वाढल्या पाहिजेत. योगिराज महाराज गोसावी म्हणाले, लाखो भाविक नाथांच्या काल्याच्या प्रसादासाठी येथे येतात. त्यांनाच जर प्रसाद मिळत नसेल तर हा सोहळा बाहेर ठेवण्यास काही हरकत नाही, शिवाय हाच प्रसाद प्रत्येक भाविकापर्यंत गेला तर परंपराही टिकून राहील. या दोघांच्या भूमिकेवर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पैठण येथे नाथषष्ठी यात्रेला २९ मार्चपासून होणार सुरुवात
सध्या ठरावीकांनाच पास
दहीहंडीच्या दिवशी नाथ समाधी मंदिरात ठरावीकांनाच प्रवेश दिला जातो. त्यासाठी पास दिले जाते. मात्र जो वारकरी याच काल्याच्या दहीहंडीसाठी दूरवरून आलेला असतो त्यालाच याचा लाभ घेता येत नाही.
दहीहंडीचा कार्यक्रम बाहेर घ्यावा
^काल्याच्या दहीहंडीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात त्यांनाच त्या काल्याच्या दहीहंडीचा लाभ होत नसेल, तर दहीहंडीचा कार्यक्रम मंदिरात न घेता तो बाहेर घेतला जावा. - प्रा. संतोष गव्हाणे, पैठण.
नाथ महाराज वाळवंटात काल्याचे कीर्तन करत
^संत एकनाथ महाराजदेखील स्वत: काल्याचे कीर्तन हे नदी पात्रातील वाळवंटात करत होते. आज नाथमंदिराची उभारणी करून दीडशेहून अधिक वर्ष लोटली आहेत. मंदिर जुने झाले असून काल्याच्या दिवशी येथे मंदिरात चार ते पाच हजार वारकऱ्यांची गर्दी होते. यातील शंभरवर लोक हे मंदिराच्या छतावर जातात. हे धोकादायक ठरू शकते.
- संतोष तांबे, संचालक, मसाप.