आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानोबा, तुकारामच्या जयघोषाने तेरनगरी दुमदुमली, संत गोरोबाकाकांच्या यात्रेला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर - संत गोरोबाकाकांच्या यात्रेला मंगळवारपासून(दि.१४) भक्तिभावाने सुरुवात झाली. तेर नगरीमध्ये दाखल झालेले हजारो भाविक ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात तल्लीन झाले आहेत. बुधवारी (दि.१५)आमदार राणाजगजितसिंह पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चनाताई यांनी गोरोबाकाकांच्या समाधीची अभिषेक पूजा केली. हजारो वारक-यांनी नगर प्रदक्षिणा घालून काकांच्या पालखीचे दर्शन घेतले. गावामध्ये सडा, रांगोळ्या, तोरणांमुळे वातावरण प्रसन्न झाले आहे. ही यात्रा १८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

नगर प्रदक्षिणेवेळी ठिकठिकाणी सडा, रांगोळी काढून पालख्यांचे स्वागत करण्यात आले. प्रदक्षिणा मार्गावर थंड पाणी, थंड पेयाचे वाटप करण्यात आले. पाणीटंचाई लक्षात घेऊन भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने फडकऱ्यांना जागेवर पाच टँकरद्वारेे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने यावर्षी प्रथमच बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

प्रदर्शनाची सोय यावर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक फडावर दिवसभर भजन, भारूड, अभंग व रात्री हरीकीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. संत गोरोबा काकांची ही यात्रा संतांची असल्याने गावात मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ठिकठिकाणाहून आलेल्या दिंड्यामध्ये बालवारकऱ्यांची संख्या वाढली आहे. या वारकऱ्यांनी केलेल्या कलेचे सादरीकरण पाहून कौतुक होत आहे. जामखेड(जि.नगर) येथून कुंभार समाजाची एकमेव दिंडी यात्रेमध्ये दाखल झाली असून, तसेच सोबत असलेला रथ भाविकांचे आकर्षण ठरत आहे. यात्रेमध्ये विविध स्टॉल्स उभारण्यात आले असून, पेढा, गळ्यातील माळ, प्रासादिक साहित्याने यात्रा फुलून गेली आहे. रहाटपाळणे, चित्रपटगृहांमुळे तरुणांची गर्दी वाढत आहे.

शुक्रवारपासून मोफत अन्नछत्र सुरू होणार
संत गोरोबा काका व शिवमंदिर समितीच्या वतीने शुक्रवारपासून (दि.१७) भाविकांच्या सहयाेगातून तेरमध्ये प्रथमच मोफत अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. या अन्नछत्राचा शुभारंभ मंदिर समितीचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी मंदिरात करण्यात येणार आहे. हे अन्नछत्र भाविकांसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती समितीच्या सहसचिव अर्चनाताई पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.