नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव संतुकराव हंबर्डे यांनी सोमवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. हे शिवबंधन त्यांना चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठाच्या नोकरीत असतानाही त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मंगळवारी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेनंतर निवडक पत्रकारांशी बोलताना डाॅ. विद्यासागर
म्हणाले, हंबर्डे यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात परवानगी मागणारा अर्ज दिला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमात निवडणूक लढवण्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे त्याबाबत आम्ही शासनाकडे सल्ला मागितला आहे. शासनाचे स्पष्टीकरण आल्यानंतर त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल. विद्यापीठ नियमात जी तरतूद आहे त्यानुसारही
कारवाई केली जाईल.
वर्धापन दिन
विद्यापीठाच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डाॅ. विद्यासागर यांनी दिली. दि. १९ रोजी विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव व पारितोषिक
वितरण समारंभ होणार आहे.
दि. २० रोजी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आंतरविद्यापीठ व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ होणार आहे. दि. २१ रोजी जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार आदी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरणासाठी इस्रोचे माजी कार्यकारी संचालक पद्मश्री डाॅ. प्रमोद काळे, माजी कुलगुरू डाॅ. नागनाथ
कोत्तापल्ले यांना निमंत्रित करण्यात आल्याचेही कुलगुरूंनी सांगितले.
नियम अस्पष्ट
महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम (एमसीएसआर) मध्ये शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे, राजकीय पक्षाच्या संघटनाचे सदस्यत्व घेऊ नये. राजकीय पक्षांसोबत थेट संबंध ठेवू नयेत हे स्पष्ट करण्यात आले, परंतु कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी निवडणूक लढवावी अथवा लढवू नये याबाबत नियमात स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे संतुकराव हंबर्डेविरुद्ध काय कारवाई करावी याबाबत विद्यापीठ प्रशासनच संभ्रमात आहे.