आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santukarao Humberde News In Marathi, Deputy Registrare, Divya Marathi

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव हंबर्डे यांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव संतुकराव हंबर्डे यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला. हंबर्डे यांनी मुंबई येथून ‘दिव्य मराठी’ला दूरध्वनीवर ही माहिती दिली.

शासकीय, निमशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमान्वये राजकीय पक्षात, राजकीय पक्षाच्या संघटनेत प्रवेश करता येत नाही. हा नियम डावलून हंबर्डे यांनी उपकुलसचिव पदाचा राजीनामा दिला नसतानाही सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत मंगळवारी कुलगुरू पं. विद्यासागर यांनी नियमानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर हंबर्डे यांनी मुंबई येथूनच ई-मेलवर राजीनामा पाठवला. विद्यापीठाला हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाची सुटी असल्याने राजीनामा उद्याच पाहिला जाईल, असेही हंबर्डे यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे हंबर्डे यांना नांदेड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी मिळणार
असल्याची चर्चा आहे.
दुसरे उच्चपदस्थ अधिकारी
विधानसभा निवडणुकीसाठी विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा देणारे संतुकराव हंबर्डे दुसरे उच्चपदस्थ अधिकारी आहेत. यापूर्वी २००४ च्या निवडणुकीत विद्यापीठाचे लेखाधिकारी बी.पी.नरोड यांनी विद्यापीठातील नोकरीवर पाणी सोडून बिलोली विधानसभा मतदारसंघात बीएसपीकडून निवडणूक लढवली. नरोड यांना केवळ ४ हजार ९३४ मते मिळाली. भास्करराव पाटील खतगावकर (५९ हजार ६३९ मते) यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता संतुकराव हंबर्डे यांनी निवडणुकीसाठी उपकुलसचिवपद सोडले.