आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात आयआरआरएसच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - दूरसंचार विभागाच्या वतीने जालन्यात आंतरराष्ट्रीय उपग्रह अनु-श्रवण केंद्र अर्थात सॅटेलाइट मॉनिटरिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या उल्लेखनीय कार्यामुळे येथून आता देशभरातील आयआरआरएसच्या अधिकाऱ्यांना स्पेक्ट्रम मॅनेजमेंटचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोमवारी पाच अधिकाऱ्यांच्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

मोबाइल, टीव्ही चॅनल, एटीएम सेवा आदी विविध सेवांमध्ये सॅटेलाइट स्पेक्ट्रमचा वापर केला जातो. त्यामुळे स्पेक्ट्रम अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये तसेच त्याचा योग्य वापर व्हावा यासाठी जालना येथे १९९२ मध्ये सॅटेलाइट मॉनिटरिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. अशा प्रकारचे हे देशातील एकमेव केंद्र असल्याने या केंद्राला मोठे महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत येथून उत्कृष्ट कार्य सुरू असल्याने संचार मंत्रालयाने येथे आता सॅटेलाइट स्पेक्ट्रम निरीक्षण आणि व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू केले आहे. इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्व्हिसेस (आयआरआरएस)चे प्रशिक्षण घेतलेल्या वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना येथून प्रशिक्षण दिले जाईल. अधिकाऱ्यांनुसार प्रशिक्षणाचा कालावधी वेगवेगळा असणार आहे.
जालन्याचीच निवड का?
या केंद्रातून सॅटेलाइट स्पेक्ट्रम मॉनिटरिंगचे उल्लेखनीय कार्य झाले आहे. त्यासाठी या केंद्राचे अधिकारी अजय सिंघल आणि ओंकार नाथ यांची पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दूरसंचारचे विभागीय अधिकारी अनिल कुमार आणि सल्लागार एन. के. भोला यांनी जून २०१४ मध्ये या केंद्राची पाहणी केली. त्याच वेळी येथून सॅटेलाइट स्पेक्ट्रम मॅनेजमेंटचे प्रशिक्षण सुरू करण्याची चर्चा झाली आणि हे प्रशिक्षण सुरू झाले.