आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शतकोटीच्या रोपांची पाण्याविना तडफड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवडीअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपांपैकी एक कोटी 25 लाख 57 हजार 267 रोपे शिल्लक राहिली असून सध्या उन्हाच्या काहिलीने त्यांची रया जात आहे. पिण्याच्या पाण्याचीच टंचाई असल्याने रोपांना जगवण्यासाठी पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न सामाजिक वनीकरण, कृषी व वन विभागाला पडला आहे.
शतकोटी वृक्ष लागवडीअंतर्गत कृषी, सामाजिक वनीकरण, वन विभाग व ग्रामपंचायतींना रोप तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागाने त्यांच्या रोपवाटिकेत 37 लाख 49 हजार रोपे तयार केली. त्यापैकी 12 हजार रोपांची लागवड करण्यात आली, तर 5 लाख 924 रोपे मृत झाली. आता 32 लाख 36 हजार 76 रोपे शिल्लक आहेत.

सामाजिक वनीकरण विभागाने या योजनेअंतर्गत 19 लाख 24 हजार रोपे तयार केली. 99 हजार 600 रोपांची लागवड करण्यात आली. 45 हजार 126 रोपे मृत झाली. आता 17 लाख 79 हजार 274 रोपे शिल्लक आहेत. वन विभागाने 39 लाख रोपे तयार केली होती. पैकी साडेतीन लाखांची लागवड करण्यात आली. 60 हजार मृत झाली. 34 लाख 90 हजार रोपे शिल्लक आहेत. जिल्ह्यातील 786 ग्रामपंचायतींनी 77 लाख 38 हजार 455 रोपे तयार केली होती. पैकी 25 लाख 28 हजार 538 ची लागवड झाली. 11 लाख 58 हजार मृत झाली. 40 लाख 51 हजार 917 रोपे शिल्लक आहेत.

हवेत 27 कोटी 73 लाख 85 हजार
विविध विभागांच्या रोपवाटिकांतील बोअर आटले. ज्या रोपवाटिकेत पाण्याची सोय आहे, तिथे रोपांना स्थलांतरित करण्यात येत आहे. जवळपास पाणी नसल्याने टँकरच्या पाण्याशिवाय आता पर्याय नाही. शिवाय 9 महिन्यांच्या रोपांचे 18 महिन्यांच्या रोपांत रूपांतर करावयाचे सुचवले आहे. यासाठी 13 कोटी 95 लाख रुपये लागणार आहेत. सामाजिक वनीकरण व वन विभाग रोपांना जगवणार असून याकरिता सामाजिक वनीकरणाने 51 लाख 53 हजारांची तर वन विभागाने 27 लाख 32 हजारांची जिल्हाधिका-यांकडे मागणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या रोपांना जगवण्यासाठी किमान 13 कोटी रुपये लागणार आहेत. सध्या पाण्याची वानवा आहे त्यामुळे ही रोपे जगली तरच येत्या पावसाळ्यात वृक्षारोपणाला रोपे उपलब्ध होणार आहेत.

मजूर मिळेनात
रोपांना पाणी देण्यासाठी मग्रारोहयोअंतर्गत मजूर लावता येतात. त्यांना दिवसाकाठी 145 रुपये मजुरी देता येते. तथापि, खासगी कामावर त्यांना 200 ते 250 रुपये मजुरी मिळत असल्यामुळे या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली आहे.