आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्यजीवांच्या मदतीला माणुसकी धावून आली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पाण्याविना होणारी वन्यजीवांची तडफड थांबवण्यासाठी लातूरच्या वनविभागाने पुढाकार घेतला असून वन्यजीवांचा अधिवास असलेल्या ठिकाणी 200 पाणवठे उभारण्यात आले आहेत. त्यात टँकर्स व बैलगाड्यांनी पाणी टाकले जात आहे. विशेष म्हणजे या विधायक कामासाठी मोफत पाणी देऊन शेतकर्‍यांनीही वनचरांप्रती असलेली आपले उत्तरदायित्व पत्करून माणुसकीचा सेतू अधिक भक्कम केला आहे.
जिल्ह्यात पाच वर्षांपासून वन्यजीवांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. काळवीट, ससे, रानडुकरे, कोल्हे, सायाळ, मुंगूस, तरस, लांडगे, फळखाऊ वटवाघळे, घोरपड, मोर, तितर, पारवे, घुबड, पिंगळा, सुतार पक्षी, पोपट, धनेश, विविध प्रकारचे पाणपक्षी, माळरानावरील पक्षी, घार, ससाण्यासारखे शिकारी पक्ष्यांचा त्यात समावेश आहे. तथापि, उन्हाळा आला की या जीवांची पाण्याविना तडफड होते. पाण्याच्या शोधात हे जीव मैलागणती भटकंती करतात. बर्‍याच वेळा ही सफर त्यांच्या जिवावर बेतते. हरणे व मोर मानवी वस्त्याजवळ येतात अन् कुत्र्यांना आयते सावज मिळते. विहिरीतील पाणी पिण्यासाठी उतरताना पडल्याने दोन हरणे व चार रानडुकरे मेल्याची घटना औसा व जळकोट तालुक्यात तीन वर्षांपूर्वी घडली होती. त्यानंतर वनविभाग सतर्क झाला होता. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ए. जे. मुदमवार, गुंडेराव साबळे, ए.जी.पाटील व कामाजी पवार यांच्या पुढाकारातून लातूर वनविभागात प्राण्याचा अधिवास असलेल्या ठिकाणी हौद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पाणवठे उभारण्यात आले. आजघडीस 200 पाणवठे असून ते वन्यप्राण्यांची तहान भागवत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मुदमवार म्हणाले. जिथे टँकर पोहोचू शकते तेथे टँकर्स व अन्य ठिकाणी बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी 40 वनरक्षक व 120 वनमजूर नियुक्त करण्यात आले आहेत. दर तीन दिवसांना पाणी टाकले जाते. पक्षांना पाणी पिण्यासाठी काही ठिकाणी कुंड्या बांधण्यात आल्या आहेत. स्वच्छतेकडे लक्ष पुरवण्यात आले असून पाणवठय़ात कचरा असेल तर तो साफ करण्यात येतो. एप्रिलपासून ही सोय करण्यात आली आहे.
उपकार नव्हे, आनंद मिळतो
पाण्याविना होणारी जिवाची कासावीस आम्ही अनुभवली आहे. माणसाला पाणी मिळेल, वन्यजीवांनी जायचे कुठे? पाण्यावर त्यांचाही अधिकार आहे हे आपण जाणले पाहिजे. देवाच्या दयेने माझ्या शेतातील बोअरला पाणी आहे. मी ते या मुक्या जीवांसाठी माझे कर्तव्य म्हणून देतो. यात उपकाराची भावना नाही, तर आनंद आहे. सतीश शिंदे, शेतकरी, नकुलेश्वर बोरगाव, ता. औसा
लातूर जिल्ह्यातील तालुकानिहाय पाणवठे
औसा 47, लातूर 38, चाकूर 27, अहमदपूर 17, निलंगा 18, रेणापूर 12, उदगीर 12, जळकोट 9, शिरूर अनंतपाळ 10, देवणी 10
वनसंरक्षकाकडून आढावा
वन्यजीवांच्या पाणीप्रश्नाबाबत औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुडा दक्ष असून दर आठवड्याला ते संबंधित अधिकार्‍यांकडून आढावा घेत आहेत. उस्मानाबादचे विभागीय वनाधिकारी बी. एम. कदम यांनीही याकामी विशेष लक्ष पुरवले आहे.